भूसंपादनात शिरलाय ‘व्हायरस’

By admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:49+5:302016-08-28T05:20:49+5:30

जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत

'Virus' in land acquisition | भूसंपादनात शिरलाय ‘व्हायरस’

भूसंपादनात शिरलाय ‘व्हायरस’

Next

वाकड : जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्यांच्या कामाला भूसंपादनाची बाधा झाल्याने ही कामे रखडली आहेत. स्थानिकांचा विरोध अन एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेने ही बाधा लवकर सुटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. युद्धपातळीवर हे काम सुरूअसल्याचे भासविले जात असले, तरी अद्याप काही रस्त्यांचे भूसंपादनदेखील झाले नसल्याचे लोकमतने घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे.

वाहतूककोंडीतून मार्ग काढून आयटीयन्सचा वेळ वाचविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पर्यायी
रस्त्यांचे काम युद्धपातळीवर करून ते रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याशिवाय हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या सुटणार नाही. दरम्यान, वाहतूक विभागाच्या नियोजित संख्येपेक्षा दररोज कित्येक पटीने वाहनांची वर्दळ या ठिकाणी वाढतच आहे. त्यामुळे वाहतुकीचे
तीन तेरा वाजले आहेत.
भूमकर वस्तीपासून विनोदे वस्तीमार्गे हिंजवडी लक्ष्मी चौक ते पुन्हा फेज दोन टाटा जॉन्सन हा रस्ता तीनशे मीटरचा आहे. राजीव गांधी आयटी पार्कमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता फायदेशीर ठरू शकतो. फेज दोनकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित आणि अर्धा रस्ता महापालिकेच्या अंतर्गत असे या सहापदरी रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, रस्त्यावरील एका जुन्या नाल्यावर छत्तीस मीटरचा पूल बांधण्याचे काम सुरू झाल्यांनतर काही स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे नाल्याचेदेखील काम बंद पडले अन पालिकेने अखेर तो नाला बुजविला.
या रस्त्यादरम्यान दोन ठिकाणी मोठ्या लांबीचे काम थांबले आहे. तर विनोदे वस्तीच्या हद्दीपासून पुढील रस्ता अचानक अरुंद झाला आहे. या रस्त्यात प्रचंड तफावत जाणवते, तर लक्ष्मी चौकापासून पुढील रस्त्याचे काम भू-संपादनाला झालेल्या विरोधामुळे थांबले होते. मात्र, हा प्रश्न मार्गी लागल्याने काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
आयटी पार्ककडे चांदे-नांदे
मार्गे सूसमध्ये येताच लहान पूल असल्याने वाहतूककोंडी होते.
त्यामुळे सूस खिंडीत त्वरित भुयारी
मार्ग करावा, जेणेकरून रस्ता मोठा व पर्यायी मिळाल्याने वाहने विनाअडथळा जातील. तसेच
वाकड येथील राजीव गांधी पुलाच्या मागील आणि पुढील रस्ता प्रशस्त सहापदरी आहे.
मात्र, हा पूल दोनपदरी असल्याने वाहतूक येथे खोळंबते. त्यामुळे या पुलाला आणखी एक समांतर पूल उभारावा, तसेच इन्फोसीस फेज १ ते घोटावडे या १३ किमी लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता चारपदरी केल्यास पिरंगुटमार्गे वाहतूक सुरळीत होईल.
अशा अन्य रस्त्यांची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन व आॅपरेटिंग प्रमुख कर्नल चरणजीत भोगल
यांनी दिली. तर केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनीही या
दोन ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याचे सुचविले होते.
(वार्ताहर)

लवकरच कामे पूर्ण करणार
आयटी पार्कमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही प्रस्तावित पर्यायी रस्त्यांचे काम पूर्णत्वास जात असून, काही येत्या दोन-तीन महिन्यांत कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे यांनी दिली. यासह भू-संपादनाला काही स्थानिक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विरोधामुळे भू-संपादन प्रक्रिया थंडावल्याने कामांना उशीर होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, योग्य तो तोडगा काढून कामे लवकर सुरू करण्याचे पीएमआरडीए आणि एमआयडीसीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामे अद्याप रखडलेली
पुणे शहरातून आयटी पार्ककडे येताना वारजे, बाणेरमार्गे पुणे-मुंबई महामार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे भुजबळ चौक, शिवाजी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून सूस चांदे-नांदेमार्गे असणाऱ्या जुन्या रस्त्याची एमआयडीसीने डागडुजी व रुंदीकरण कले. मात्र, याची रुंदी कमी असल्याने तो रस्ता वाढवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, हे काम अद्याप तरी रखडले आहे. यंदाच्या पावसाळ्यात यादेखील पर्यायी रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरणाचा प्रस्ताव गेला आहे, असे एमआयडीसीकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: 'Virus' in land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.