'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:09 PM2024-05-24T18:09:59+5:302024-05-24T18:10:12+5:30
आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर पोलीस कोठडीची आवशक्यता नसल्याचे न्यायालयाने सांगितले
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर विशालला सत्र न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती संपल्याने पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आज सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडीची आवशक्यता नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकीलांकडून युक्तिवाद करण्यात आला. आरोपींच्या वकिलांकडून प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. घटनेच्या दिवशी गंगाराम नावाचा ड्रायव्हर होता. ड्रायव्हर पहील्या दिवसापासुन तपासाठी उपलब्ध आहे. १७५८ रुपये आरटीओची फी भरली नोही. म्हणून आयपीसीचा ४२० लावला आहे. अशा प्रकारे कलम लावणे ते योग्य आहे का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आता पर्यंत आरटीओ काय करत होते? गाडी कधी घेतली? आरोपींकडे कागदपत्रे होती म्हणुन पोलीसांना कळले टॅक्स भरला नाही. मग आता कोणती कागदपत्रे हवी आहेत. गाडीशी संबधीत सर्व कागदपत्रे पोलीसांना मिळाली आहे. सुप्रिम व हाय कोर्टाचे निर्णय आहेत. कोणत्याही व्यक्तीला त्याच्यावरील गुन्हा चुकीचा वाटत असेल तर तो कोठे ही राहुन अटकपुर्व जामीनासाठी जाऊ शकतो. अशी तरतुद असताना औरंगैबादला जाऊन तपास करायचा आहे. असे पोलीस म्हणत आहेत. पोलीस कोठडी मागताना ते चुकीचे असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. आरोपीला ( विशाल अग्रवाल ) अटक करण्याआधी नोटीस देणे आवश्यक होते. ती न देता अटक करण्यात आली आहे. १९९अ हे मोटर व्हेईकल ॲक्टचे कलम लागु होत नाही. असे आरोपींच्या वकीलांचे म्हणणे आहे. या मुद्द्यांवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशाल अग्रवालला आजपर्यंत होती ३ दिवसाची पोलीस कोठडी
पुणे अपघातानंतर विशाल पसार झाला होता. त्याला छत्रपती संभाजीनागमधून ताब्यात घेण्यात आले होते. आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत युक्तीवाद केला. त्यामध्ये ब्लॅक पब चे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला. विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करत ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.