अग्रवाल पिता-पुत्राला अजून एका प्रकरणात जामीन; आतापर्यंत २ गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 12:57 PM2024-06-23T12:57:57+5:302024-06-23T12:58:18+5:30
Vishal Agarwal Surendra Agarawal Granted Bail: कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल होता
पुणे: सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या पिता-पुत्राला आणखी एका प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी जामीन मंजूर केला.
सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाने ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे यांच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, सीईओ रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांची सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर भादंवि ३०६, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात त्यांना न्यायलयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला.