सचिन कुंडलकरांच्या पाेस्टचा विश्वंभर चाैधरींकडून खरपूस समाचार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:52 AM2019-01-10T11:52:52+5:302019-01-10T12:00:22+5:30

साहित्य संमेलनावर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी टीका करताना यवतमाळला कमी लेखले हाेते, त्यांच्या फेसबुक पाेस्टचा विश्वंभर चाैधरी यांनी समाचार घेतला.

vishvambhar choudhari took stand on sachin kundalkars post | सचिन कुंडलकरांच्या पाेस्टचा विश्वंभर चाैधरींकडून खरपूस समाचार म्हणाले...

सचिन कुंडलकरांच्या पाेस्टचा विश्वंभर चाैधरींकडून खरपूस समाचार म्हणाले...

googlenewsNext

पुणे : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नयनतारा सेहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आल्याने संमेलन वादात सापडले असताना या वादात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी उडी घेतली हाेती. यवतमाळ कुठे आहे हे मला माहित देखील नव्हते अशा शब्दात त्यांनी साहित्य संमेलनावर टीका करताना यवतमाळला कमी लेखले हाेते. त्याचा खरपूस समाचार घेत सामाजिक कार्यकर्ते यांनी कुंडलकरांना उद्देशून पाेस्ट लिहीत यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही ग्लॅमरस एरिया नाही जुहू बीच सारखा अशी उपराेधिक टीका त्यांच्यावर केली आहे. 

    इंग्रजी साहित्यिका नयनतारा सेहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पाठवलेले निमंत्रण संमेलनाच्या काही दिवस आधी मागे घेण्यात आले. सरकारी दबावाला बळी पडून हा निर्णय आयाेजकांनी घेतल्याची टीका सर्वच स्तरातून करण्यात आली. यावर फेसबुक पाेस्ट लिहीत सचिन कुंडलकरांनी संमेलनावर टीका केली. परंतु ही टीका करत असताना त्यांनी यवतमाळला कमी लेखले. कुंडलकर यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये लिहीले हाेते की, 'यवतमाळ कुठं आहे हेच मला माहीत नव्हतं. अशा अनोळखी जागी गर्दी करून भयंकर भाषणं ऐकण्यापेक्षा पुण्या-मुंबईत किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जमून छोटी गेट टूगेदर्स करणं जास्त चांगलं होणार नाही का?, मोकळेपणानं लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसांनी येऊ गर्दी करायची काय गरज आहे?
 
   अनेकांनी कुंडलकरांच्या पाेस्टवर टीका केल्याने त्यांनी ती पाेस्ट डिलीट केली. यावर विश्वंभर चाैधरी यांनी फेसबुक पाेस्टच्या माध्यामातूनच उत्तर दिले असून चाैधरी म्हणतात, प्रिय कुंडलकर,यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही ग्लॅमरस एरिया नाही जुहू बीच सारखा. हा तर महाराष्ट्रातला तो जिल्हा जिथं सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्त्यांचा अंधार भरून राहिला आहे. तुमचं अन्न तो तयार करतो, त्यांच्यातला शेवटचा आत्महत्त्या करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मोजून धान्य मिळत राहील. त्याला तुच्छ लेखण्याची मस्तीही चालून जाईल तोपर्यंत.पण तुम्ही त्याचं पोट चालवता त्यापेक्षा जास्त तोच तुमचं पोट चालवतो. त्याच्या शेजारच्याच जिल्ह्यात वीज तयार होते जी तुम्हाला सदैव लाईम'लाईट'मध्ये ठेवते! तुम्ही शूटींगच्या वेळी 'लाईट्स ऑन' वगैरे ओरडत असाल तेव्हा त्याचे आभार माना कारण वीज तयार करण्यात होणारं भयंकर प्रदूषण तो सहन करतो आणि तुम्हाला कायम उजेडात ठेवतो; स्वतः पंधरा पंधरा तासाचं 'लोड शेडींग' सहन करून.आणि हो पुण्यामुंबईत स्थिरावलेले त्याचे पोरगा-भाचा-भाऊ-पुतण्या हेच तुमच्या सिनेमाचे गल्ले भरून देतात. तुमचे अन्नदाता.यवतमाळ कुठं आहे आणि ते कसं आहे ते आम्ही तुम्हाला चर्चेत समजावून सांगू. नकाशासह. कधीही, पुण्यातल्या कोणत्याही कट्ट्यावर. खात्री आहे की आमच्याशी बोलल्यावर तुमच्या मनात असे प्रश्न उभेच राहणार नाहीत.

Web Title: vishvambhar choudhari took stand on sachin kundalkars post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.