"फक्त सवलती जाहीर करून महिलांचे भविष्य उज्ज्वल होत नाही"; स्वारगेटमधल्या घटनेवरुन विश्वजीत कदमांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:36 IST2025-02-27T11:31:48+5:302025-02-27T11:36:22+5:30

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेवरुन विश्वजीत कदम यांनी महायुती सरकारवर टीका केली.

Vishwajit Kadam criticized the Mahayuti government over the incident of atrocities against a young woman at Swargate bus stand | "फक्त सवलती जाहीर करून महिलांचे भविष्य उज्ज्वल होत नाही"; स्वारगेटमधल्या घटनेवरुन विश्वजीत कदमांची टीका

"फक्त सवलती जाहीर करून महिलांचे भविष्य उज्ज्वल होत नाही"; स्वारगेटमधल्या घटनेवरुन विश्वजीत कदमांची टीका

Pune Swargate Bus Stand Rape Case: पुण्यातील स्वारगेट बसस्थाकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने तरुणीला खोटं सांगून आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एसटी स्थानकामध्येच आरोपीने पीडितेवर दोनवेळा अत्याचार केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनीही या घटनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. केवळ सवलती जाहीर करून महिलांचं भविष्य उज्ज्वल होत नाही, अशी टीका विश्वजीत कदम यांनी केली.

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर नराधमाने अमानुष बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मंगळवारी पहाटे फलटणला निघालेल्या तरुणीवर सराईत गुन्हेगाराने खोटं बोलून बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेत अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेवरुन विश्वजीत कदम यांनी आधी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलायला हवी होती असं म्हटलं.

"स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रवासादरम्यान भर रस्त्यात जिथे पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे, अशा ठिकाणी जर महिलांवर अत्याचार होत असतील, तर हा महाराष्ट्र महिलांसाठी खरंच सुरक्षित राहिलाय का? महिला सुरक्षेच्या गाजावाजा करणाऱ्या घोषणा आणि या योजनांच्या नावाखाली होत असलेले राजकारण आणि केवळ कागदावर असलेल्या उपाययोजनांनी आज पुन्हा एका भगिनीचं आयुष्य उध्वस्त झालं. निवडणूक काळात माताभगिनींच्या मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना चालवण्यापेक्षा, आधी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलली असती, तर कदाचित आजची घटना घडली नसती! राज्यात महिला सुरक्षेची दयनीय अवस्था आहे. केवळ सवलती जाहीर करून महिलांचं भविष्य उज्ज्वल होत नाही, त्यांच्या सुरक्षिततेची शाश्वती देणं ही खरी जबाबदारी आहे," असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.

"पुढील आठवड्यात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन याकरिता निधीची तरतूद करावी, अशी माझी ठाम मागणी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, निर्भय महिला केंद्रे, पोलिसांची तत्परता आणि कठोर कायदे याकरिता आर्थिक तरतूद झाली पाहिजे. महिला सुरक्षित नसतील, तर महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने कसा पुढे जाईल? हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथं महिलांचा सन्मान हा सर्वोच्च राहिला पाहिजे. मी सरकारला पुन्हा एकदा आवाहन करतो की महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना १०० टक्के सुरक्षितता मिळणे आवश्यक आहे. केवळ घोषणा आणि आश्वासनं नाहीत, आता ठोस कृती हवी! महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण झालं पाहिजे," असंही विश्वजीत कदम म्हणाले.
 

Web Title: Vishwajit Kadam criticized the Mahayuti government over the incident of atrocities against a young woman at Swargate bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.