संघर्षाच्या काळात रुग्णवाहिका मालकाकडून माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:33+5:302021-05-11T04:10:33+5:30

आसिफ शेख यांच्या भावना : रुग्णवाहिकेचे पैसे केले माफ पुणे : आसिफ शेख यांचे मेव्हणे समीर शेख यांना दोन-तीन ...

A vision of humanity from the ambulance owner during times of conflict | संघर्षाच्या काळात रुग्णवाहिका मालकाकडून माणुसकीचे दर्शन

संघर्षाच्या काळात रुग्णवाहिका मालकाकडून माणुसकीचे दर्शन

googlenewsNext

आसिफ शेख यांच्या भावना : रुग्णवाहिकेचे पैसे केले माफ

पुणे : आसिफ शेख यांचे मेव्हणे समीर शेख यांना दोन-तीन वर्षांपासून स्वादुपिंडाचा त्रास होत होता. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शस्त्रक्रिया होऊ शकली नव्हती. मागच्या आठवड्यात तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी आयसीयूमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले. दिवसभर रुग्णाला घेऊन तीन-चार रुग्णालयांमध्ये हेलपाटे घालूनही बेड उपलब्ध होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी रुग्णाचा आयुष्याशी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. मात्र, या दोन दिवसांत आसिफ शेख यांना रुग्णवाहिका मालकाच्या रूपाने माणुसकीचा अनुभव घेता आला.

समीर शेख यांना खूप त्रास होऊ लागल्याने गुरुवारी केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. एका डॉक्टरांच्या ओळखीने रुग्णवाहिकेतून त्यांना शिवाजीनगर येथील एका हॉस्पिटल नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून व्हेंटिलेटर लावावा लागेल, असे सांगितले, मात्र रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. त्यांची अँटिजन टेस्टही निगेटिव्ह आली. त्या दरम्यान शहरातील आणखी तीन-चार रुग्णालयांना फोन करून आसिफ यांनी चाचपणी केली. मात्र, कोठेही बेड शिल्लक नव्हता. पौड रस्त्यावरील हॉस्पिटलला नेण्यात आले. पेशंटची कोविड टेस्ट केल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आणि सिटी स्कॅन केले. त्यामध्ये पाच इतका स्कोअर आल्याने मध्यम संसर्ग झाल्याचे निदान केले आणि उपचारांसाठी दुसरीकडे हलवावे लागेल, असेही सांगितले.

भोसरी येथील सिद्धी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी ओळख असल्याने त्यांना रिपोर्ट पाठवले आणि रुग्णाला घेऊन आसिफ शेख भोसरीला गेले. पौड रस्त्यावरील हॉस्पिटलपासून दुसरी रुग्णवाहिका शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. आसिफ यांनी श्री गजानन महाराज ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचे गोपाळ जांभे यांना फोन केला. त्यांनी अमोल नावाच्या ड्रायव्हरसह रुग्णवाहिका पाठवली आणि ३५०० हजार रुपये होतील, असे सांगितले. भोसरीला पोचेपर्यंत रुग्णाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले होते. त्यांना ताबडतोब डायलिसिसवर ठेवावे लागेल अशी डॉक्‍टरांनी कल्पना दिली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत धावपळ करूनही कोठेही उपचार मिळणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आसिफ यांची बहीण हतबल झाली. नवऱ्याला घेऊन थेट घर गाठायचे, असा निर्णय तिने घेतला. त्यानुसार लोहियानगर येथील घरी रुग्णाला घेऊन जाण्याचे ठरले. रुग्णाला घरी सोडण्यापासून घरामध्ये आणून ठेवण्यापर्यंत रुग्णवाहिका चालकाने मदत केली.

आसिफ यांच्या बहिणीचे घर ७० स्क्वेअर फूट एवढे छोटे आहे. ड्रायव्हरने हलाखीची परिस्थिती पाहून जांभे यांना फोन केला असावा. जांभे यांनी आसिफ यांना ''चालकाला फक्त त्याचे मानधन द्या. बाकीचे पैसे देऊ नका राहू द्या'', असा निरोप फोनवर दिला. तसेच त्यांना धीर दिला. दुसऱ्या दिवशी समीर शेख यांचे निधन झाले.

-------------

या संघर्षामध्ये जांभे यांनी दाखवलेली माणुसकी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी आहे. सध्या साथीच्या काळात सर्वत्र रुग्णांची आणि नातेवाईकांची लुटालूट सुरू असताना त्यांच्या रूपाने आलेला माणुसकीचा अनुभव खूपच दुर्मिळ आहे.

- आसिफ शेख

Web Title: A vision of humanity from the ambulance owner during times of conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.