सहायक आरोग्य प्रमुखांना ‘डॉक्टर डे’निमित्त आयुक्तांकडून भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:31+5:302021-07-02T04:09:31+5:30
पुणे : कोरोनाकाळात दिवसरात्र काम करणाऱ्या महापालिकेतील सहायक आरोग्यप्रमुखांना ‘डॉक्टर्स डे’निमित्त महापालिका आयुक्तांनी मोठी भेट दिली. सहायक आरोग्य प्रमुखपदी ...
पुणे : कोरोनाकाळात दिवसरात्र काम करणाऱ्या महापालिकेतील सहायक आरोग्यप्रमुखांना ‘डॉक्टर्स डे’निमित्त महापालिका आयुक्तांनी मोठी भेट दिली. सहायक आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतरही पूर्वीच्याच वेतन श्रेणीवर काम करत असलेल्या, तीन सहायक आरोग्यप्रमुखांना शासनाप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेणी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. मनीषा नाईक, डॉ. संजीव वावरे आणि डॉ. कल्पना बळीवंत अशी या सहायक आरोग्यप्रमुखांची नावे आहेत. या तिघानांही मार्च २०१८ मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या आकृतिबंध राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याने त्यांना पदोन्नती देताना वेतनश्रेणी मात्र जुनीच ठेवण्यात आली होती.
‘डॉक्टर्स डे’च्या मुहूर्तावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या तीनही सहायक आरोग्यप्रमुखांना शासनाप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीप्रमाणे मार्च २०१८ पासून नवीन वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले आहेत. सुधारीत वेतनश्रेणीनुसार त्यांच्या वेतनातील ग्रेड वेतनावर भरीव वाढ मिळणार आहे. कोरोनाकाळात महापालिकेच्या आरोग्य विभागाप्रमाणेच सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पुणे शहर पहिल्या लाटेपासून देशातील हॉटस्पॉट ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपवाद वगळता सुट्टी घेत अहोरात्र कोरोनाशी लढा दिला आहे.