पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला २० हजार नागरिकांची भेट; तब्बल ७ लाखांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:27 PM2022-08-17T13:27:40+5:302022-08-17T13:27:54+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दुप्पट पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयातील नवीन प्राण्यांना पाहण्याची मजा लुटली
पुणे: स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्त कात्रज राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला २० हजार नागरिकांनी सोमवारी भेट दिली. एरवी शनिवार-रविवार येथे १० हजार पर्यटक भेट देत असतात, तर इतर दिवशी त्याहीपेक्षा कमी असतात. मात्र, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दुप्पट पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयातील नवीन प्राण्यांना पाहण्याची मजा लुटली. तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.
नेहमीप्रमाणे सिंह, वाघ, हत्ती, शेखरू, अजगर, सापांच्या इतर जाती पाहण्यासाठी गर्दी असते. त्यात नव्याने केरळवरून दाखल केलेला गवा किट्टू व अविका या जाेडीची भर पडली आहे. त्यामुळे वीस हजार पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेत प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी ७ लाख २४ हजार रुपयांची तिकीट विक्री झाली आहे. तर २५० पर्यटकांनी पर्यावरण ई-बसचा वापर करीत संग्रहालय पाहिले. यामध्ये ई-बसची दहा हजार तिकीट विक्री झाली. यामुळे मनपाच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.
एका दिवसात ७ लाख २४ हजार रुपयांचे उत्पन्न
प्राणी संग्रहालयाला सोमवारी १९ हजार ३२३ पर्यटकांनी भेट दिली असून, ७ लाख २४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ऑनलाईन पेमेंटची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. यंदा स्वातंत्र्यदिनी भर पावसातही पर्यटकांची गर्दी दिसून आली. - राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मित्रांसोबत प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी आलो. यंदा भर पावसात छत्री घेऊन रांगेत उभे होतो. प्राणी संग्रहालयात गवे, जंगल कॅट, शेकरू हे नवीन प्राणी आले आहेत. त्यांना पाहण्याची उत्सुकता होती. सुटी असल्याने खूप गर्दी झाली होती. - रामेश्वर बेलके, विद्यार्थी