Ashadhi Wari: माऊली खंडेरायाच्या भेटीला! जेजुरीत भंडाऱ्याची उधळण, ज्ञानेश्ववरांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:07 PM2024-07-04T18:07:31+5:302024-07-04T18:10:14+5:30
कपाळी गोपीचंदाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन असा वैष्णवांच्या मेळा माऊलींचे जेजुरीत आगमन
बी. एम. काळे
जेजुरी: मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी....मल्हारी मल्हारी माझा मल्हारी मल्हारी....आलो तुमच्या दारी ...ध्यावी आम्हा वारी ....बेलभडारांची....अशी ओवी गात ,नाचत , भंडाऱ्याच्या उधळणीत ,,माऊलींचा पालखी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा जेजुरी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरात मुक्कामी पोहोचला.
आज पहाटे माऊलींचा सोहळा सासवडकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. सासवड ते जेजुरी १७किलोमीटरचा टप्पा पार करताना मार्गावरील बोरावके मळ्यातील न्याहारी आणि शिवरी येथे यमाई मातेचे दर्शन ...दुपारचे भोजन आणि विसावा उरकून साकुर्डे फाटा येथील अल्प विसावा घेत सोहळ्याने जेजुरी जवळ केली.
पहाटेपासूनच सासवड -जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. कपाळी गोपीचंदाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन, टाळ -चिपळ्या मृदंगाच्या साथीने, मुखातून होत असलेला विठूनामाचा गजर असे चित्र वारीच्या वाटेवर दिसून आले. जेजुरीचा मल्हारगड नजरेच्या टप्प्यात येताच """येळकोट येळकोट जयमल्हार "सदानंदाचा येळकोट """असा जयघोष वैष्णवांच्या मेळ्या -मेळ्यातून होत होता. विठुरायाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने पावले पडत असताना कुलदैवत खंडेरायाचे दर्शन वैष्णवांसाठी योगच होता.
माऊली खंडेरायाच्या भेटीला! जेजुरीत भंडाऱ्याची उधळण, ज्ञानेश्ववरांच्या पालखीचे जल्लोषात आगमन #pune#ashadhiwari2024#jejuri#santdnyaneshwarmaharajpalkhisohlapic.twitter.com/LKMgYol9SL
— Lokmat (@lokmat) July 4, 2024
सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी शहरात प्रवेश करता झाला . पालखी रथापुढे २७ दिंड्या तर मागे २३० हुन अधिक दिंड्या होत्या. यावेळी मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौदंडे, विश्वस्त पोपट खोमणे, मंगेश घोणे ,पांडुरंग थोरवे ,विश्वास पानसे , अभिजित देवकाते , आदींसह जेजुरी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. नगरपालिकेच्या वतीने फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली होती. काही समाज सेवक,स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी लोकेसेवेत सहभागी होऊन अनवाणी चालणाऱ्या वैष्णवांच्या पायांची मसाज करताना दिसून आले. माऊली चॅरिटेबल ट्रष्ट मुंबई यांच्या वतीने मोफत औषधोपचार ,करण्यात येत होते. व्यसनमुक्ती युवक संघाचे पथक सहभागी होऊन समुपदेशन करत होते.पुणे भवानीपेठ येथील व्यापारी बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनासह इतर विभागाने चोख व्यवस्था ठेवली होती
जेजुरीचा खंडेरायांच्या धार्मिक विधी रूढीसंस्कार परंपरेमध्ये हळद भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे. पूजा अभिषेक ,जागरण गोंधळ ,तळीभंडारा धार्मिक विधींमध्ये भंडारा हा असतोच, त्याच्या सोनपिवळ्या रंगांमुळे, पुरातन काळापासून "देवा तुझी सोन्याची जेजुरी "अशी म्हण प्रचलित आहे. आळंदी पंढरपूर मार्गावर असलेली जेजुरी आणि तेथील कुलदैवत खंडेरायाचे दर्शन म्हणजे "शैव आणि वैष्णव "यांचा मिलापच ....महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून वारीमध्ये सहभागी झालेले वैष्णव भंडाऱ्याची उधळण करत, कपाळी लावत भक्तिभावाने आपली भोळीभाबडी श्रद्धा अर्पण करताना दिसून येतात. या पालखी सोहळ्यातही भंडारा उधळण होताना खंडेरायाचे सोनपिवळे लेणे अंगावर घेऊन वैष्णव बांधव नाचत गात असल्याचे चित्र दिसून आले.