पाहुण्या ‘फ्लेमिंगो’ने बहरला उजनी जलाशयाचा परिसर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 12:01 AM2019-01-12T00:01:53+5:302019-01-12T00:02:50+5:30
पर्यटकांची गर्दी : पर्यटनाला मिळाली चालना
पळसदेव : सोलापूर, पुणे, उस्मानाबाद अशा तीन जिल्ह्यांतील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या उजनीला हिवाळा आला की ओढ लागते ती युरोपीय पाहुण्यांची अर्थात पांढºयाशुभ्र डौलदार फ्लेमिंगोची. त्यामुळेच दरवर्षी न चुकता हे फ्लेमिंगोही हजारो मैलांचा प्रवास पूर्ण करत उजनीच्या जलाशयाच्या काठावर येतात आणि मग पांढºया धुक्यात हे पांढरे शुभ्र पक्षी एकरूप होऊन जातात. या पाहुण्यांचे रूप पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह शेकडो किलोमीटरवरुन पक्षी व पर्यटन प्रेमी येतात. तशीच गर्दी यंदाही या पाहुण्यांना पाहण्यासाठी उजनी जलयाशयावर झाली आहे.
उजनी जलाशय परिसरात कुंभारगाव (इंदापूर) परिसर फ्लेमिंगो पक्षांच्या वास्तव्याचे प्रमुख ठिकाण. दरवर्षी युरोपीय प्रांतातून ‘फ्लेमिंगो’ पक्षी या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी येतात. परंतु, या वर्षी या पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. शनिवारी व रविवारी या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कुंभारगाव हे तर जणू फ्लेमिंगो पक्ष्यांचे माहेरघर झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले आहे. या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी दोन पॉइंट आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर, नगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पर्यटक पक्षीमित्र, फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. पक्षी पाहण्याबरोबर माशाचे जेवण, तसेच ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकृती पाहावयास मिळत असल्याने पर्यटक खूष होतात.
याबाबत ‘उजनी पार्क’ प्रमुख कुंडलिक धुमाळ यांनी सांगितले की, उजनीच्या या ठिकाणी जवळपास तीन हजार फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या आहे. या पक्ष्यांनी तीन गट केले आहेत. या पक्ष्यांबरोबर इतर ही जवळपास दोनशे जातीचे पक्षी आहेत. विशेषत: शनिवारी व रविवारी या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी मोठी गर्दी असते.