भाविकांना आस ज्ञानोबा-तुकोबांच्या भेटीची
By admin | Published: July 1, 2016 01:43 AM2016-07-01T01:43:01+5:302016-07-02T12:49:09+5:30
जगद्गुरू तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. १ जुलै) हडपसर येथे सकाळच्या न्याहारीसाठी येत आहे.
हडपसर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. १ जुलै) हडपसर येथे सकाळच्या न्याहारीसाठी येत आहे. पालखीच्या स्वागतासाठी; तसेच वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी हडपसरवासीयांनी जय्यत तयारी केली आहे. गाडीतळाजवळ दोन्ही पालख्यांचा विसावा असतो.
शुक्रवारपासून विविध पालख्या येथून पंढरपूरच्या दिशेने जातात. वारकऱ्यांच्या रांगा पहाटेपासूनच लागल्या आहेत. त्यामुळे हा परिसर भक्तिमय झाला आहे. प्रशासनाबरोबर नागरिकांनी संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना स्वयंशिस्त पाळली पाहिजे.
गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरांचे फावते. त्यामुळे महिलांनी मौल्यवान दागिने घालू नयेत. गर्दी करून गोंधळ करण्यापेक्षा रांगेतून दर्शन घेतले तर सर्वांना सोयीचे होईल. यासाठी प्रत्येकाने स्वत:च काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
भैरोबानाला ते सत्यपुरम या मार्गावर ज्ञानेश्वरमहाराजांच्या व भैरोबानाला ते मांजरी फार्मपर्यंत तुकाराममहाराजांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पालखी व वारकऱ्यांना दोन्ही मार्गांवरून जाताना कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी नागरिकांनी घेतली आहे.
ठिकठिकाणी उभारले स्वागत कक्ष
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा या वर्षी गाडीतळावरील पीएमपी थांब्यात सकाळी होईल. दर्शनासाठी रांगांची व्यवस्था केली आहे. मंडप उभारण्यात आला आहे. तर, दर वर्षीप्रमाणे तुकाराममहाराजांच्या पालखीचा विसावा पूर्वीच्या ठिकाणीच असेल. अनेक सामाजिक संस्था, मंडळे यांनी स्वागत कक्ष उभारले आहेत. आरोग्य शिबिर, औषधे, फराळ वाटपासाठी येथील रहिवाशांनी तयारी केली आहे.