राजगुरुनगर ते पंढरपूर ‘विठाई’ बससेवेचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:42 AM2018-12-27T00:42:04+5:302018-12-27T00:42:10+5:30

राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

'Vitai' bus service  Starting from Rajgurunagar to Pandharpur | राजगुरुनगर ते पंढरपूर ‘विठाई’ बससेवेचा प्रारंभ

राजगुरुनगर ते पंढरपूर ‘विठाई’ बससेवेचा प्रारंभ

googlenewsNext

राजगुरुनगर : येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या बसचे पूजन प्रवासी रोहिदास पाचारणे व याच गाडीचे चालक-वाहक यांच्या हस्ते करून बस मार्गस्थ करण्यात आली.

या प्रसंगी कार्यशाळा अधीक्षक कुंडलिक बेंढाले, विठाई बसचे चालक प्रकाश राठोड, वाहक कालिदास चिखले, संदीप गावडे, सतीश दळवी, दिलीप चौधरी, विठ्ठल वनघरे अनिल मंडलिक आदी कर्मचाऱ्यांसह प्रवासी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून राजगुरुनगर येथून दावडी, आळंदी मार्गे पंढरपूर अशी बससेवा सुरू आहे. या भागातून आळंदी मार्गे पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वारकरी व भाविक नियमित या बससेवेचा वापर करीत असतात. तसेच, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी विविध गावांतून सुमारे सात ते आठ गाड्यांचे बुकिंग एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगारातून केले जाते. तसेच, याशिवाय वैयक्तिकरीत्याही अनेक भाविक या गाडीने पंढरपूरला प्रवास करण्यासाठी पसंती देतात. प्रवासी सेवेचा विचार करता व या मार्गावरील वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता, अत्याधुनिक स्वरूपातील ‘विठाई’ नावाच्या नवीन बससेवेचा प्रारंभ महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

या मार्गावर पूर्वीची चांगली चालणारी बस असलेल्या एसटी बसच्या स्वरूपात बदल करून ती अत्याधुनिक व अधिक आरामदायी आसनव्यवस्था व रंगरंगोटी करण्यात आली. आकर्षक स्वरूपात दिसणारी अशी बस या मार्गावर आजपासून सोडण्यात आली आहे. तसेच, या गाडीची उंचीही काही प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सुमारे ५० प्रवासी आरामदायी पद्धतीने बसून या गाडीतून प्रवास करू शकतात. याशिवाय, अतिरिक्त वाढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी वेगळ्या बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, या बसवर बाहेरील बाजूने पांडुरंग, वारकरी व वारकरी संप्रदायाच्या ध्वजाचे आकर्षक चित्र रेखाटलेले आहे, असे आर. जी. हांडे यांनी सांगितले.

विठाई ही बस राजगुरुनगर, आळंदी, स्वारगेट, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटणमार्गे पंढरपूरला जाईल. सकाळी ७.४५ वाजता ही बस राजगुरुनगर येथून सुटेल, तर दुपारी साडेचार वाजता पंढरपूर येथून राजगुरुनगरकडे मार्गस्थ होईल. तसेच, या बसचा तिकीट दरही साध्या बसप्रमाणेच (रु. ३४५) असेल. सर्व प्रकारच्या सवलतीच्या दरातील पाससह या बसमधून प्रवास करता येईल, असेही हांडे यांनी सांगितले.

Web Title: 'Vitai' bus service  Starting from Rajgurunagar to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.