विठ्ठलने मन मोठे करून दिला पेपर
By Admin | Published: February 28, 2015 11:20 PM2015-02-28T23:20:49+5:302015-02-28T23:20:49+5:30
हॉर्टिकल्चरमध्ये शिकणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याने वडिलांच्या अपघाती निधनाने खचून न जाता त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी देऊन बारावीची परीक्षा दिली.
रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर व्यवसाय अभ्यासक्रमातील इ. १२ वी हॉर्टिकल्चरमध्ये शिकणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याने वडिलांच्या अपघाती निधनाने खचून न जाता त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी देऊन बारावीची परीक्षा दिली. त्याच्या शिकण्याच्या जिद्दीला सलाम करून त्याने इतर विद्यार्थ्यांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी व ग्रामीण भागातील शाळेत शिकत असलेल्या विठ्ठल सोमनाथ येळे (रा. पारोडी, ता. शिरूर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो घरापासून ६ कि.मी.अंतरावर असलेल्या निमगाव म्हाळुंगी येथे इ.१२ वी हॉर्टिकल्चरमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सोमनाथ किसन येळे यांना दोन दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. त्या अपघाताचे मनावर दडपण असतानाही विठ्ठल मोठ्या आत्मविश्वासाने त्या काळातील परीक्षेला सामोरे गेला. मात्र, दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास अभ्यास करताना त्याला वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी कानावर आली. त्याच दिवशी हॉटिकल्चरचा पेपर असल्याने ती परीक्षा कशी द्यायची, असा यक्ष प्रश्न त्याच्या पुढे पडला.
त्यानुसार विठ्ठलने सकाळी १० वाजता वडिलांच्या देहाला मुखाग्नी देऊन वडिलांच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख बाजूला ठेवून बोर्डाच्या वेळापत्रकानुसार वेळेवर परीक्षेला हजर झाला व मोठ्या जिद्दीने बोर्डाची १२ वीची परीक्षा दिली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी वाघोली परिसरात अशीच घटना घडली होती. (वार्ताहर)
४त्याच्या वर्गमित्राच्या माध्यमातून त्याला शिकविणाऱ्या प्रा.संजय देशमुख व प्रमोद उगले, तसेच तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आर. बी. गुजर प्रशालेच्या इ.१२ वी परीक्षा केंद्र संचालक रत्नप्रभा देशमुख यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यास धीर देत त्याचे मनोबल वाढविले व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे सुचविले.