विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; महादेवाची सृष्टी, पर्यावरण संवर्धन, पुण्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:17 PM2024-09-09T13:17:46+5:302024-09-09T13:18:17+5:30

पुण्यातील गणेश मंडळांनी धार्मिक, पारंपरिक, सामाजिक देखाव्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असून भक्त ते पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत

Vitthal Rukmini Temple Mahadev creation environment conservation auspicious atmosphere of Ganeshotsav in Pune | विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; महादेवाची सृष्टी, पर्यावरण संवर्धन, पुण्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण

विठ्ठल-रूक्मिणी मंदिर; महादेवाची सृष्टी, पर्यावरण संवर्धन, पुण्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण

पुणे : गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण शहरभर चैतन्य संचारले असून, मंगलमय वातावरण पहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात दुसऱ्याच दिवशी सुट्टीचा दिवस आल्याने रविवारी (दि.८) मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात चांगलीच गर्दी पहायला मिळाली. अनेक देखावे सुरू झाले आहेत. दगडूशेठ गणपतीसमोर तर दिवसरात्र अलोट गर्दी पहायला मिळत आहे.

शहरामध्ये गणपती मंडळांनी विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावाहून देखील भाविक येत आहेत. सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे पहायला मिळत आहेत. ते पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करू लागले आहेत. बाजीराव रस्त्यावर अभिनव कला महाविद्यालयापासून वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मोठी वाहने सोडली जात नाही. जेणेकरून भाविकांना मध्यवर्ती भागातील गणपती पहायला अडथळा येऊ नये. सायंकाळनंतर गणपती पहायला भाविक घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गणरायांचे दर्शन घेतले. त्यासाठी मेट्रोने देखील फेऱ्या रात्रभर सुरू ठेवल्या होत्या. अनेकांनी मेट्रोचा वापर केला आणि गणेश दर्शनाचा आनंद लुटला.

विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर !

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, कसबा पेठतर्फे यावर्षी विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर साकारले आहे. पहिल्या दिवसापासूनच देखावा सुरू करण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंडळाची स्थापना १९३५ साली झाली असून, मंडळाचे यंदा ८९ वे वर्ष आहे.

सागवानाच्या रथामध्ये महादेवाची सृष्टी !

कसबा पेठेतील जर्नाधन पवळे मंडळाने यंदा कायमस्वरूपी टिकेल असा सागवानापासून शिवशंकराचा रथ तयार केला आहे. हा पुढील शंभर वर्षे टिकेल असा आहे. यामध्ये शिवशंकराची सर्व सृष्टी दाखविण्यात आली आहे. या रथामध्ये गणपती, त्रिशूल, कार्तिक स्वामी, मोर, नंदी, मूषक, चंद्र, सूर्य आदी सर्व प्रतिकृती बनविल्या आहेत. हा रथ वीस दिवसांमध्ये ५० कारागिरांनी तयार केला. त्यासाठी सर्वधर्मीयांनी मदत केली आहे. या रथाची उंची १६ फूट आहे. दहा फुटाचा चौरस केला आहे. मिरवणुकीत कुठेही अडचण होऊ नये म्हणून त्यानुसार रथ बनवला आहे. मिरवणुकीसाठी खास ट्रॉली करण्यात आली आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती देखील आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुशांत करडे, उत्सवप्रमुख राकेश डाकवे, कार्याध्यक्ष विजय ठाकरे, उपाध्यक्ष मिलिंद पोटफोडे यांनी परिश्रम घेतले. भाविकांना सेल्फी काढण्यासाठी पॉइंट केला आहे. लहान मुलांसोबत ज्येष्ठांनाही नंदीच्या कानात आपली इच्छा सांगायची असते, त्यासाठी खास ८ फुटांचा नंदी तयार केला आहे.

हिराबाग मित्रमंडळ : थ्रीडीमध्ये तांडव देखावा

टिळक रोडवरील हिराबाग मित्रमंडळाने दिमाखदार चलचित्र सादर करण्याची भव्य परंपरा यंदाही कायम केली आहे. यंदा भारतात पहिल्यांदा गणेशोत्सव देखाव्यासाठी "थ्रीडी हॉलोग्राम प्रोजेक्शन" चा प्रयोग करण्यात आला आहे. हायड्रॉलिक टेक्नॉलॉजी, न्यूमॅटिक टेक्नॉलॉजी, रोबोटिकचा वापर केला आहे. अज्ञान आणि अहंकाराचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या अपस्मरा राक्षसाला लाभलेल्या शक्तीमुळे जगात अनियंत्रित स्थिती निर्माण झाली. या शक्तीला शमवण्याकरिता शिवाने नटराज रूप घेऊन 'तांडव' नावाचे विश्वनृत्य केले. नटराजाचे विश्वनृत्य ‘थ्रीडी होलोग्राम प्रोजेक्शन’द्वारे साकारण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळ कसबा पेठ यांचे यंदा १३१ वे वर्ष आहे. मंडळाने यंदाही ज्वलंत विषयावर प्रकाशझोत टाकणारा देखावा साकारला आहे. रिलायन्स ग्रुपने वनतारा प्रकल्प तयार केला आहे. त्या वनताराचा देखावा मंडळाने साकारला आहे. वनतारा प्रकल्पात मानवामुळे पर्यावरणाचा नाश होत असून, पशुपक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करण्याचा सामाजिक संदेश यातून मिळत आहे. जामनगरमधील वनतारातील प्राणी खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत. मात्र पृथ्वीतलावरील नैसर्गिक अधिवासातील प्राण्यांची कैफियत देखाव्यात मांडली आहे. त्यांचे संरक्षण आपल्याला करावे लागणार आहे. मानवी हस्तक्षेपाचा निसर्गचक्रातील प्रत्येक घटकावर दुष्परिणाम होत आहे. ते यातून मांडले आहे.

Web Title: Vitthal Rukmini Temple Mahadev creation environment conservation auspicious atmosphere of Ganeshotsav in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.