'विठ्ठल शेलार, गणेश मारणेपासून जीवाला धोका...' गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

By नम्रता फडणीस | Published: February 1, 2024 06:41 PM2024-02-01T18:41:09+5:302024-02-01T18:41:38+5:30

दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यासंबंधीचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे...

'Vitthal Shelar, threat to life from killing Ganesh...' Supplementary response of gangster Sharad Mohol's wife | 'विठ्ठल शेलार, गणेश मारणेपासून जीवाला धोका...' गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

'विठ्ठल शेलार, गणेश मारणेपासून जीवाला धोका...' गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यासंबंधीचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी बुधवारी (दि. ३१) रात्री पाठलाग करून संगमनेरजवळ नाशिक रोड येथून अटक केली. या गुन्हयातील १५ आरोपींसह गणेश मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने मारणे याला गुरुवारी (दि. १) विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे कोर्टात हजर करण्यात आले. सुनील तांबे यांनी सांगितले की, आत्तापर्यंत या गुन्ह्यात एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असून, या दोघांनी खुनाचा कट रचला. दि. ५ जानेवारीला शरद मोहोळ चा खून झाला. या वीस दिवसांमध्ये तो फरार होता. या काळात बँगलोर, ओरिसा, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या पाच राज्यात तो फिरला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच मोहोळचा खून केल्यानंतर 'आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत असे आरोपींनी सांगितले आहे.

सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी फिर्यादीमध्ये गणेश मारणे याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. हे गंभीर गुन्हे बघता आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपी गणेश मारणे याचे वकील राहुल देशमुख यांनी सरकारी वकिलांच्या मागणीला विरोध केला. आरोपीवर २००८ नंतर एकही दखलपात्र गुन्हा नाही. पोलिसांकडून आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत असे आरोपी सीसीटीव्हीमध्ये म्हटले असल्याचे सांगितले जात आहे. हे सीसीटीव्हीचे फुटेज युट्यूबवर देखील व्हायरल झाले आहे. मात्र आरोपी असे काही साधे पुटपुटतही नसल्याचे दिसते. त्यामुळे आरोपीला या कटात गोवण्यात आले असून, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गणेश मारणे याला दि. ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी १ ते १५ आरोपी उद्या ( दि. २) कोर्टात हजर करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या सर्व आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: 'Vitthal Shelar, threat to life from killing Ganesh...' Supplementary response of gangster Sharad Mohol's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.