अंनिस लघुपट स्पर्धेद्वारे उठविणार आवाज

By Admin | Published: June 30, 2017 04:05 AM2017-06-30T04:05:09+5:302017-06-30T04:05:09+5:30

जातिप्रथा व प्रथेनिगडित अनेक समस्यांबाबत सांस्कृतिक क्षेत्रात अधिक गंभीर चिंतन होऊन नवीन आशयासह लघुपट निर्माण करून

Voice to rise through the Anis short film competition | अंनिस लघुपट स्पर्धेद्वारे उठविणार आवाज

अंनिस लघुपट स्पर्धेद्वारे उठविणार आवाज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जातिप्रथा व प्रथेनिगडित अनेक समस्यांबाबत सांस्कृतिक क्षेत्रात अधिक गंभीर चिंतन होऊन नवीन आशयासह लघुपट निर्माण करून या समस्येमुळे घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाणार आहे. ही जातप्रथेविरुद्धची आक्रमक चळवळ समाजातील लघुपट, माहितीपट व अ‍ॅनिमेशनपट यांसारख्या प्रभावशील माध्यमांद्वारे पोहचवली जाणार आहे. कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे जातीपाती प्रथा आणि त्यांच्या विविध समस्या या विषयावर आधारित विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा घेण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या माध्यमात आपल्याला जात विषय मांडता येणार आहे. ही स्पर्धा खुला, विद्यार्थी व कार्यकर्ता अशा गटांकरिता आयोजित करण्यात आली आहे. या विजेत्या लघुपटांना २५ हजार रुपये, १५ हजार व पाच हजार या तीन स्वरूपात पारितोषिके व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच जात विषयावरील माहितीपट, अ‍ॅनिमेशन पटांकरिता वेगळे पारितोषिक असणार आहे. चित्रपट व समाजातील मान्यवरांकडून लघुपटांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या लघुपटांचे प्रदर्शन २८, २९ व ३० आॅक्टोबर रोजी नॅशनल फिल्म अर्काइव्ह आॅफ इंडिया, पुणे येथील सभागृहात केले जाईल. स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनी केले जाईल, अशी माहिती या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे सांस्कृतिक राज्य कार्यवाह योगेश कुदळे, आटपाट निर्मिती संस्थेच्या गार्गी कुलकर्णी, नंदिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. लघुपट पाठविण्याची अंतिम मुदत २५ ते ३० सप्टेंबर आहे. सर्व लघुपट साधना मीडिया सेंटर, शनिवार पेठ, पुणे या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन समितीतर्फे केले आहे.

Web Title: Voice to rise through the Anis short film competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.