मतदान करा...अन् मिसळ सवलतीत खा!
By admin | Published: October 15, 2014 05:12 AM2014-10-15T05:12:14+5:302014-10-15T05:12:14+5:30
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून काही सेवाभावी संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
पुणे : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून काही सेवाभावी संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. मतदान करून बोटावरील शाई दाखविल्यास सवलतीमध्ये मिसळ, पॅटीस खायला देण्याची, तर एका वॉशिंग सेंटरने मतदान करणाऱ्यांना चारचाकी गाडी मोफत वॉशिंग करून देण्याचा आॅफर दिली आहे.
गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५० पेक्षा कमी झाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून मतदारांमध्ये सोशल मीडियाद्वारे जनजागृती वाढत चालली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काही संस्था व कंपन्यांनी मतदान करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच, मतदान करणाऱ्यांना सवलती देण्याच्या योजना आणल्या होत्या. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढली होती. त्याच धर्तीवर आता विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कोथरूड व शहराच्या मध्यवर्ती पेठांतील काही संस्था, कंपन्या, दुकाने व व्यक्तींनी मतदानासाठी आवाहन केले. त्यासाठी एका हॉटेल चालकाने मतदान करणाऱ्यांना मिसळ सवलतीत देण्याची, तर एका बेकरीने पॅटीस सवलतीत देण्याची आॅफर जाहीर केली आहे.
सुशिक्षित व उच्चभ्रू व्यक्ती मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, अशी टीका होते. त्यामुळे एका वॉशिंग सेंटर चालकाने चारचाकी असलेले जे मतदार मतदान करतील, त्यांनी बोटावरील शाई दाखविल्यास त्यांची चारचाकी गाडी मोफत वॉशिंग करून देण्याची सवलत जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)