Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:37 PM2024-11-08T14:37:55+5:302024-11-08T14:38:33+5:30

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत असून त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षितच

Vote only for those who will give priority to environment friendly things; Appeal of environmentalists | Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

पुणे : विधानसभेच्या निवडणुका असल्याने आता कोणता उमेदवार पर्यावरणाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करतो, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. भविष्यात पुणे शहरात टेकडी संवर्धन, पाणीटंचाई, पूरस्थिती याविषयी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भावी आमदार काही ठोस पावले उचलतील का? जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे, असे आवाहन देखील पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षित आहे. त्यावर राजकीय पक्षांनी काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक पर्यावरणवादी लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, जलदेवता अभियानाचे शैलेंद्र पटेल, वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य आदींचा समावेश आहे. ही मंडळी सातत्याने पर्यावरण बचावसाठी काम करत आहेत.

जाहीरनाम्यात हवेच हे मुद्दे

१) पुणेकरांना स्वच्छ हवा आणि मुबलक पाणीपुरवठा
२) सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर व्हावा
३) जमिनीवरील जलस्त्रोत अतिक्रमणमुक्त व प्रदूषणमुक्त करावे
४) भूगर्भाची पातळी खालावत असून, ती सुधारण्यासाठी देखभाल यंत्रणा कार्यान्वित व्हावी
५) शहरातील सर्व इमारतींवर पर्जन्यजल पुनर्भरण करण्यास प्राधान्य द्यावे
६) हवेतील कर्बवायू अधिक शोषला जावा, यासाठी वृक्षलागवड व्हावी
७) हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी खासगी वाहने कमी करून सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करावे
८) तापमानवाढीवर शालेय विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करावेत
९) सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी हरित व पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य द्यावे
१०) नागरी वस्त्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन द्यावे, रस्त्यावरील सर्व दिवे सौर ऊर्जेवर करावेत
११) कचरा समस्या कमी करण्यासाठी खतप्रकल्प राबवावेत, व्यवस्थापन यंत्रणा अत्याधुनिक करावी
१२) रस्त्यांवरील गटारीमध्ये शोष खड्डे करून वाहणारे पाणी भूजलात जाण्यासाठी प्रयत्न करावेत

पुण्याची लोकसंख्या ७० लाखांहून अधिक आहे. वाहनेदेखील ५० लाखांपेक्षा अधिक असल्याने सर्वसमस्या निर्माण होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य नगरनियोजन करणे अपेक्षित असते, ते होत नाही. त्याविषयी जाहीरनाम्यात उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच पर्यावरणाचा मुद्दा समाविष्ट करून ते काम करण्यास प्राधान्य देऊ, असेही सांगावे, तरच त्यांना पुणेकरांनी मत द्यावे. - निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, पर्यावरणप्रेमी

पुण्यातील टेकड्या या शहराचे फुप्फुसे आहेत. त्यांचे संवर्धन केल्याने भविष्यात भूगर्भाची पातळी चांगली राहील. वेताळ टेकडी ही पावसाचे पाणी जिरवते आणि त्यामुळे भूगर्भातील पाण्यावर आजूबाजूचे लाखो लोक आपली तहान भागवतात. त्यामुळे टेकडीचे संवर्धन करणारा उमेदवार हवा. त्याने पर्यावरणासाठी काम करावे. टेकडीवरून जे तीन प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते रद्द करण्यासाठी प्राधान्य द्यावे, तरच त्यांना पुणेकर मतदान करतील. - सुमिता काळे, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा म्हणून घोषित करावे. ते घोषित करण्यासाठी उमेदवारांनी पाठपुरावा केला पाहिजे. जो उमेदवार यासाठी काम करण्याचे मान्य करेल, त्याला आम्ही मत देऊ. पुण्याचे पर्यावरण जपणे हीच आताची गरज आहे. - सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

उमेदवारांनी यावर काम करावे

१) बालभारती ते पौड फाटा रस्ता टेकडीवरून नको
२) एचसीएमटीआर हा टेकड्यांना फोडणारा प्रकल्प रद्द करा
३) पंचवटीमार्गे जाणारे दोन बोगदे कायमचे बासनात घाला
४) सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी, खासगी वाहने कमी होतील

Web Title: Vote only for those who will give priority to environment friendly things; Appeal of environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.