महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम
By राजू इनामदार | Published: July 7, 2023 04:21 PM2023-07-07T16:21:39+5:302023-07-07T16:22:40+5:30
ज्यांच्या जीवावर निवडून आलो, त्या मतदारांना एका शब्दानेही विश्वासात न घेता राजकीय व्यक्तींचा सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठा संताप
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या महानाट्याला सुरुवात झाली. इतिहासात नोंद होईल असे जबरदस्त धक्के राजकारणात दिसून आले. मी या पक्षासोबत कधीच जाणार नाही, मी यांच्याबरोबर कधीही सत्ता स्थापन करणार नाही असं म्हणणारे आता एकत्र आल्याचे दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर तर नाट्यसत्तांतर पुन्हा सुरु झाले आहे. आता मतदारांसमोर निवडणुकीबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कोणाला मतदान करावे या संभ्रमात मतदार सध्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेने नवीनच मोहीम हाती घेतली आहे. मनसेच्या शहर शाखेने ‘एक सही संतापाची’ या मोहिमेचे आयोजन केले आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या पक्षफूट व पक्षप्रवेशाच्या घडामोडींवर हे सगळे किळसवाणे आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांचा तोच सूर लक्षात घेऊन मनसेची शहर शाखा ‘एक सही संतापाची’ मोहीम राबवणार आहे. या घडामोडींवर असेच मत असलेल्यांनी आपला संताप एका स्वाक्षरीतून व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघात शनिवारी व रविवारी असे दोन दिवस ही मनसेचे कार्यकर्ते ही मोहिम राबवणार आहेत असे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कळवले आहे. ज्यांच्या जीवावर निवडून आलो, आमदार झालो, अनेक वर्षे सत्ता भोगली त्या मतदारांना एका शब्दानेही विश्वासात न घेता पक्ष फोडणाऱ्या, नेत्याला दुषणे देण्याच्या वृतीबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये फार मोठा संताप आहे. त्याला बाहेर पडण्याला जागा मिळावी यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आल्याचे बाबर यांनी सांगितले. शनिवारी (दि.९) कोथरूड, कसबा, वडगाव शेरी व पर्वतीमध्ये तर रविवारी (दि.९) शिवाजीनगर, हडपसर, खडकवासला, कॅन्टोन्मेंट या मतदारसंघातील महत्वाच्या ठिकाणी नागरिकांना स्वाक्षरी करण्याचे आवाहन करण्यात येईल.