पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग 

By अजित घस्ते | Published: November 19, 2024 11:44 AM2024-11-19T11:44:22+5:302024-11-19T11:52:35+5:30

पुणे : शहर व जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय कामानिमित्त अनेक बाहेरगावचे नागरिक राहतात. त्यात राज्यात एकाचवेळी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ...

Voters in Pune are drawn to the village, booking of luxury cars by candidates  | पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग 

पुण्यातील मतदार गावाकडे ओढले, उमेदवारांकडून लक्झरी गाड्यांचे बुकिंग 

पुणे : शहर व जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय कामानिमित्त अनेक बाहेरगावचे नागरिक राहतात. त्यात राज्यात एकाचवेळी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक जात आहेत. पक्षाकडूनही मतदार यादीत नावे पाहून नातेवाईकांकडून मोबाईल नंबर घेऊन उमेदवार शहरातील नागरिकांना गावाकडे ओढत आहेत. याचा परिणाम पुणे शहरातील मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो.

पुणे शहरालगतच्या तालुक्यांमधील मतदारसंघांमध्ये मतदार खेचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. निवडणूक आणि जिल्हा प्रशासनाकडून गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पुण्यामध्ये शहरी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र पुण्यातील मतदार मूळ गावाकडे निघाले आहेत. किंबहुना, अनेकांना गावाकडे बोलावून तेथेच ठेवण्यात आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या मतदारांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मतदानाचा टक्का वाढवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था, उद्योग, व्यवसाय निमित्ताने लोक राहत आहेत. यामध्ये मराठवाडा आणि खान्देश भागातून मोठ्या प्रमाणात लोक पुण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकांच्या काळात या मतदारांची नोंदणी पुण्यातील मतदार यादीत करण्यात आली होती. मात्र त्यांची गावाकडील मतदार यादीतील नावे कायम आहेत. यावेळी विधानसभा निवडणूक राज्यभर एकाच दिवशी होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी पुण्यात राहणाऱ्या, परंतु गावाकडील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांसाठी वाहनांची विशेष व्यवस्था केली आहे.

शेकडो लक्झरी गाड्या तसेच इतर वाहने बुक करण्यात आली असून, जे मतदार स्वतःच्या वाहनातून मतदानासाठी जातील, त्यांचा गाडी खर्च आणि जेवणाचा खर्च उमेदवारांनी उचलला आहे.

मतदानाला जाणाऱ्या नागरिकांचा कल वाढला 
पुण्यातून सांगली, सातारा आणि कोल्हापूर पट्ट्यात सुमारे ७० ते ८० हजार मतदार जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा, खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्येदेखील मतदार गावाकडे निघाले आहेत. याशिवाय शहरालगतच्या मुळशी, भोर, वेल्हे, शिरूर, पुरंदर, खेड, आंबेगाव या मतदारसंघांतही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मतदार गावाकडे मतदानाला पसंती देत आहेत.
 

Web Title: Voters in Pune are drawn to the village, booking of luxury cars by candidates 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.