मतदार नावनोंदणी ८ आॅक्टोबरपासून
By admin | Published: October 1, 2015 12:39 AM2015-10-01T00:39:00+5:302015-10-01T00:39:00+5:30
भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १ आॅक्टोबरऐवजी आता ८ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.
पुणे : भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १ आॅक्टोबरऐवजी आता ८ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेनंतर पुढील वर्षी १६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, हीच यादी आगामी महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने तब्बल ३ लाख १६ हजार मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे यादीतून कमी केली आहेत. त्यामुळे या नवीन मोहिमेमध्ये एखाद्या मतदाराने नाव कमी झाले असेल, तर त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्याच आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक जागृकपणे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी समिक्षा चंद्राकार यांनी केले. (प्रतिनिधी)
----------------
जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये असलेल्या चुकांमुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. यामुळे हजारो लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी ही विशेष पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये नव्याने नाव दाखल करणे, नाव, पत्ता दुरुस्त करणे, दुबार नाव कमी करणे आदी अनेक कामे करण्यात येणार आहे.
यासाठी ८ आॅक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, या यादीवर ७ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणे, ३० नोव्हेंबरपर्यंत दावे
निकाली काढणे, २४ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन याद्या अद्ययावत करणे आणि पुढील वर्षी १६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
---------------
राज्य निवडणूक आयुक्तांची पुण्यात आढावा बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
८ आॅक्टोबरपासून संपूर्ण राज्यात विशेष पुनरीक्षण मोहीम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेनंतर अंतिम मतदार यादी
प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच यादी जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
यामुळे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया पुणे
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व संबंधित
सर्व अधिकाऱ्यांची येत्या ३ आॅक्टोबरला पुण्यात आढावा बैठक
घेणार आहेत.