मतदान केंद्र ट्रू वोटर अॅपवर शोधता येणार
By admin | Published: February 18, 2017 02:52 AM2017-02-18T02:52:50+5:302017-02-18T02:52:50+5:30
मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ‘ट्रू व्होटर’ मोबाइल अॅप विकसित केले आहे.
पुणे : मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ‘ट्रू व्होटर’ मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपव्दारे तुमचे नाव किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून तुम्हांला तुमचे मतदान केंद्र शोधता येणार आहे.
ट्रू व्होटर मोबाइल अॅप बरोबरच ‘लोकल बॉडी वोटर लिस्ट महाराष्ट्र गर्व्हमेंट इन’ या संकेतस्थळावरही मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधता येणार आहे. मतदारांच्या स्लिपांमध्ये मतदान केंद्र कुठले आहे याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनही मतदारांपर्यंत मतदार स्लिप पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हजारी भाग यंत्रणा उभारलेली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मतदान केंद्र निहाय मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्यावतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली. महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची पारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. (प्रतिनिधी)