तापमानामुळे पुण्याच्या मतदानात घट ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:03 PM2019-04-24T17:03:08+5:302019-04-24T17:05:00+5:30
काल दिवसभर पुण्यात उन्हाचा कडाका हाेता. काल पुण्याचे तापमान तब्बल 40.3 इतके हाेते. त्यामुळे पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे : काल पुण्याच्या लाेकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडले. पुण्यात अवघे 52 टक्के मतदान झाले. प्रशासनाने अथक परिश्रम करुनही मतदानाचा टक्का घसरल्याने पुणेकरांवर साेशल मीडियामध्ये टीका केली जात आहे. काल दिवसभर पुण्यात उन्हाचा कडाका हाेता. काल पुण्याचे तापमान तब्बल 40.3 इतके हाेते. त्यामुळे पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. पुणे, बारामती, सातारा, सांगली, काेल्हापूर, जळगाव,रावेर, औरंगाबाद, रायगड, अहमदनगर, माढा, रत्नागिरी, हातकणंगले या राज्यातील विविध भागात काल मतदान पार पडले. राज्यात 62 टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान हे काेल्हापूर येथे झाले. काेल्हापूर येथे 69 टक्के मतदान झाले. गेल्या वर्षी या ठिकाणी 74.71 टक्के मतदान झाले हाेते. तर सर्वात कमी मतदान पुण्यात झाले असून पुण्यात अवघे 52 टक्के मतदान झाले. मागच्या वर्षी 54.11 टक्के इतके मतदान झाले हाेते. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनात 2 टक्क्यांनी मतदान घटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा पारा माेठ्याप्रमाणावर वाढला आहे. साधारण 30 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणारे पुण्याचे तापमान आता 40 शी पार करु लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे. काल मतदानाच्या दिवशी 40 .3 डिग्री सेल्सिअस इतके तापमान हाेते. सकाळी 7 ते 9 यावेळेत 8.71 टक्के मतदान झाले हाेते. 11 वाजेपर्यंत हा टक्का 12.66 पर्यंत गेला. 1 वाजता 22.58 टक्के मतदान झाले हाेते. 3 वाजता हा आकडा वाढून 33.4 इतका झाला तर पाचपर्यंत 43.4 टक्के मतदान झाले हाेते. सहा पर्यंत सरासरी 52 टक्के मतदान झाले. दुपारी 11 ते 3 या वेळेत केवळ 11.54 टक्के इतकीच वाढ मतदानात झाली आहे. तर 11 ते 5 या वेळेत पाहिले तर केवळ 21 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. त्यामुळे दुपारच्यावेळी पुणेकरांनी मतदान करण्याचे टाळल्याचे दिसून येते.
दरम्यान अनेक नागरिकांना मतदार यादीत नाव न सापडल्याने तसेच व्हाेटर स्लिप न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित रहावे लागले आहे.