पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी
By नितीन चौधरी | Published: October 3, 2023 09:12 PM2023-10-03T21:12:22+5:302023-10-03T21:14:56+5:30
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात ...
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच १५७ ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांवरही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी
१६ ऑक्टोंबपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
याबाबत संबंधित तहसीलदार ६ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करतील. तर १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणार्या उदेवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर निधन, राजीनामा, अन्य कारणामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचाची पदे रिक्त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार असून, यासाठी नेहमीच्या पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या घोषणेमुळे निवडणूक जाहीर झालेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या उमेदवाराला अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडावी लागणार आहे. तसेच एक वर्षाच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागणार आहे.