भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक
By श्रीकिशन काळे | Published: October 29, 2024 06:34 PM2024-10-29T18:34:21+5:302024-10-29T18:34:34+5:30
प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून मतदानाच्या दिवशी मतदान करणे गरजेचे आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय
पुणे : ‘मतदान करणे लोकशाहीचा प्राण, मतदान करणे ही आपली शान’ अशा प्रकारचा संदेश देत अंगणवाडी सेविकांनी जनजागृती केली. त्यांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक मिळाला. ही प्रतिकृती संभाजी बागेत ६ नोव्हेंबरपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी किल्ले स्पर्धा घेतली जाते. यंदाचे हे ३० वे वर्ष हाेते. त्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या महिलांनी प्रथम क्रमांक मिळविला. किल्ले साकारताना मतदान करणे किती आवश्यक आहे, याबाबत जनजागृती केली, असे सुषमा कावडे यांनी सांगितले. यासाठी अश्विनी जगताप, मनीषा गाठे, सुप्रिया साळुंखे, श्रीकांत बुरूड, ललिता तिकोने, रेणुका मंगासले आदींनी परिश्रम केले.
खरंतर पुणे हे विद्येचे माहेरघर असून, येथे सुशिक्षित नागरिक अधिक आहेत. तरी देखील लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का प्रचंड घसरला. म्हणून या विधानसभेला तरी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी एकात्मिक बाल विकासच्या महिलांनी मतदान जागृती सुरू केली आहे. त्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. शासकीय योजनांचीही माहिती दिली आहे. पिंक ई-रिक्षा योजना, लाडकी बहीण योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी योजनांची माहिती दिली आहे.
प्रत्येकाने मतदान करण्याचा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यातून योग्य उमेदवाराला मत दिले तर तो आपल्या मतदारसंघातील कामे करू शकतो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून मतदानाच्या दिवशी मतदान करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. - सुषमा कावडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पुणे.