मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:25 AM2024-11-27T10:25:08+5:302024-11-27T10:25:16+5:30

मतमोजणीवर आक्षेप न आल्यासही मतदान यंत्रांमधील माहिती ४५ दिवसांपर्यंत संरक्षित ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत

Voting machines sealed for 45 days Period for verification if candidate objects to counting of votes | मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात आलेली सर्व मतदान यंत्रे भोसरी येथील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ‘सील’ करण्यात आली आहेत. एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेत ४५ दिवसांचा कालावधी देण्यात येताे. त्यामुळे पुढील ४५ दिवसांपर्यंत मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट गोदामात स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत. या यंत्रामधील मतदानाची माहिती शाबूत ठेवण्यात येते. त्यानंतर ही माहिती नष्ट करण्यात येते.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघांसाठी ११ हजार ४२१ मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम (बॅलेट युनिट), तर ८ हजार ४६२ कंट्रोल युनिट आणि तेवढेच व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले होते. कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये शनिवारी (दि. २३) मतमोजणी करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत सर्व २१ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी पूर्ण झाली. मतमोजणीनंतर शनिवारी रात्रीच सर्व मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले आहेत. त्या सर्व मतपेट्या सील करण्यात आल्या आहेत. निवडणुकीत मतमोजणी झाल्यानंतर काही उमेदवार अथवा राजकीय पक्षांकडून याचिका दाखल करण्याची शक्यता असते. मतमोजणीनंतर याचिका दाखल करण्याची शक्यता असल्याने ४५ दिवसांच्या कालावधीला ‘इलेक्शन पिटीशन’ असे म्हटले जाते. त्यामुळे ही शक्यता गृहीत धरून पुढील ४५ दिवसांसाठी मतपेट्या सील करण्यात येतात.

एखाद्या उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास त्याला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर मतमोजणीची पडताळणी करण्यासाठी न्यायालयाकडून आदेश देण्यात येतो. त्यानंतर ही पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया ४५ दिवसांच्या आत केली जाते. आक्षेप न आल्यासही मतदान यंत्रांमधील माहिती ४५ दिवसांपर्यंत संरक्षित ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ही माहिती आता यंत्रामध्ये ४५ दिवसांपर्यंत कायम राहणार आहे.

प्रत्यक्ष मतदानासाठी म्हणजे ‘ए’ वर्गातील यंत्रांमध्ये ११ हजार ४२१ ईव्हीएम, तर प्रत्येकी ८ हजार ४६२ कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा समावेश आहे. तर ‘ब’ वर्गातील म्हणजे प्रत्यक्ष मतदानादरम्यान, खराब झालेल्या यंत्रांमध्ये ३३ बॅलेट युनिट, २६ कंट्रोल युनिटी आणि ५६ व्हीव्हीपॅटचा समावेश आहे. मतपत्रिका तयार करताना खराब झालेल्या मतदान यंत्रे ही ‘सी’ वर्गात येतात. त्यात १०३ बॅलेट युनिट, १५० कंट्रोल युनिट, आणि २१३ व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहेत.

बॅलेट युनिट, कंट्राेल युनीट स्वतंत्र गाेदामात सील

संविधानिक लिफाफे आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी प्रत्येकी ४२१ मतदान यंत्रांसह अन्य मशीन हेदेखील गोदामात ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघासाठी २० टक्के राखीव मशीन देण्यात आले होते. प्रत्यक्ष मतदानावेळी यंत्रे बंद पडल्यास त्याऐवजी राखीव मशीन वापरता येऊ शकतील. त्यासाठी २,१३७ बॅलेट युनिट, १,५०७ कंट्रोल युनिट आणि २,२६२ व्हीव्हीपॅट हे शिल्लक ठेवलेली मशीन शनिवारी रात्री तेथील स्वतंत्र गोदामात सील करून ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Voting machines sealed for 45 days Period for verification if candidate objects to counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.