बंडखोराला मतदान; सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:47+5:302021-02-24T04:11:47+5:30
भोर : भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या व्हिपनुसार मतदान न करता बंडखोर उमेदवाराला मतदान केल्याने ...
भोर : भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या व्हिपनुसार मतदान न करता बंडखोर उमेदवाराला मतदान केल्याने ४ पंचायत समितीच्या सदस्याना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. कारवाई करण्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात असल्याचे भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी सांगितले.
२०१७ साली भोर पंचायत समितीची निवडणूक झाली. राष्ट्रवादीच्या चिन्हावर ४ सदस्य निवडून आले होते.१८ फेब्रुवारी २०२१ सभापतिपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लहू शेलार यांना उमेदवारी दिली होती. तसा पक्षादेश (व्हीप) भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सर्वांना बजावून सह्या घेतल्या होत्या.
दरम्यान, भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करता पक्षाच्या बंडखोर उमेदवार दमयंती पर्वती जाधव यांना मतदान केले आहे. यामुळे आपण पक्ष आदेशाचा भंग केलेला आहे. आपल्या या कृत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात डागाळलेली आहे. यांची दखल पक्षाने घेतली असून पक्ष आदेश डावलण्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे ठरवलेले आहे. याविषयी सदस्यांना काही खुलासा करायचा असेल तर चार दिवसांत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे लेखी खुलासा करावा, असे म्हटले आहे.
चौकट - दमयंती जाधव यांनी पक्षाकडे सभापतिपदासाठी उमेदवारी मागितली नव्हती. मात्र पक्षादेश डावलून सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरुन बंडखोरी केली. पक्षाची परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतली. जे पक्षाचे सभासद नाहीत किंवा पदाधिकारी नाहीत त्यांनी पक्षाची निष्ठा आम्हाला सांगू नये. तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष घोरपडे