मतदानाची मिळतेय पोहोच पावती; पुणे शहर निबंधक कार्यालयाने केला तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:19 PM2017-12-13T16:19:40+5:302017-12-13T16:24:47+5:30
शहर उपनिबंधक कार्यालयाने व्हीव्हीपीएटी या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडल्या असून, त्यात मतदानाबाबत कोणतीही तक्रार झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे : गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनवर (इव्हीएम) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कोणालाही मत दिल्यास ते विशिष्ट पक्षालाच जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केली होता. त्यामुळे मताची पावती मतदाराला मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती. तसे तंत्रज्ञान असलेल्या यंत्राचा यशस्वी वापर शहर निबंधक कार्यालयाने केला आहे.
शहर उपनिबंधक कार्यालयाने या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडल्या असून, त्यात मतदानाबाबत कोणतीही तक्रार झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाजी नगर येथील पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंट्स को-आॅप क्रेडीट सोसायटीचे ९ नोव्हेंबरला मतदान झाले. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे त्याचे कार्यक्षेत्र होते. या संस्थेची मतदारसंख्या ही ५ हजार इतकी होती. त्याची मतमोजणी दहा डिसेंबरला झाली.
निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडीट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) या मतदान यंत्राचा वापर करण्यात आला होता. हे यंत्र ईव्हीएम यंत्राप्रमाणेच असून, त्यात कोणाला मतदान केले याची पावतीच मतदाराच्या हाती मिळते. त्यामुळे यंत्रावरील कोणतीही कळ दाबल्यावर विशिष्ट व्यक्ती अथवा चिन्हाच्या नावे मत जमा होते, असा आरोप करण्याचा प्रकार थांबला आहे. या पूर्वी ९ जुलै रोजी हमाल नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक अशाच पद्धतीने झाली होती. या संस्थेचे सुमारे ३ हजारांहून सभासद आहेत.
याबाबत माहिती देताना शहर उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी म्हणाले, की सहकारी पतंसंस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम यंत्राचा वापर हा पुण्यातील एका पतसंस्थेत २०१५ रोजी झाला. जुलै आणि नोव्हेंबरमध्ये मतदान झाल्याची पावती देणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने मतदान झाले. पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंट्स को-आॅपरेटीव्ह सोसायटीचे ५ हजार सभासद होते. या निवडणुकीच्या रिंगणात ३२ उमेदवार उभे होते. त्यामुळे तीन मतदान यंत्रे लावावी लागली. त्यासाठी तीन जिल्ह्यांत २० मतदानकेंद्रांवर मतदान घेण्यात आले. मार्केट यार्डातील हमाल भवनात १० डिसेंबरला त्याची मतमोजणी देखील झाली. जुलै पासूनचा हा दुसरा प्रयोग होता. आम्ही दिलेले मत दुसऱ्याच व्यक्तीला गेले अशी एकही तक्रार दाखल झाली नाही.
पुण्यात प्रथमच अशा तंत्राचा वापर करुन मतदान करण्यात आले. भोसरी येथील सिग्नल सर्किट या कंपनीच्या वतीने या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.