राष्ट्रीय भावना मनात जागवा; हक्क मतदानाचा शंभर टक्के बजवा : भारुडातून मतदानाचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:40 PM2019-04-16T15:40:07+5:302019-04-16T15:50:42+5:30
संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
पुणे : एकीकडे देशातील मुख्य प्रवाहातील कलाकार कॉंग्रेस आणि भाजपाला मतदान करा असे सांगत आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र असून दुसरीकडे लोककलाकार मात्र विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवत मतदान करा असे आवाहन करु लागले आहेत. अशाच लोककलाकारांनी एकत्र येत ‘हक्क मतदानाचा १०० टक्के बजावा’ हे भारुड तयार केले आहे. संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड येथील लोकप्रबोधिनी कला मंचाच्यावतीने या व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे. या कला मंचाने लोकसंस्कृतीचे जतन करतानाच लोकरंजनातून प्रबोधनाचे काम केले आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात, क्रांतीकारक, समाजसुधारक आदी महापुरुषांचे जीवन पोवाडे, गीतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. यासोबतच व्यसनाधिनता, शिक्षणातील गळती, आरोग्य, स्वच्छता, अंधश्रद्धा, पाणी बचत आदी विषयांवरही पथनाट्य आणि कलेच्या माध्यमातून जनजागृती केली अहे.
कला मंचाने नुकतेच ‘हक्क मतदानाचा १०० टक्के बजावा’ हे भारुड तयार केले आहे. मतदानाकडे पाठ फिरवायची आणि नंतर चुकीची माणसे निवडली जातात म्हणून ओरड करायची या मानसिकतेवर बोट ठेवत जागरुकतेने मतदान केल्यास भविष्यकालीन नुकसान टाळण्याचे आवाहन या भारुडाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे भारुड लोक कलावंत आसराम कसबे यांनी लिहिले आहे. तर संगीत शाहीर बापू पवार यांनी दिले असून त्यांनीच गायले आहे. सागर मुव्हीज या संस्थेने छायांकनाची जबाबदारी उचलली होती. तर लहुमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदाडे यांनी विशेष सहकार्य दिलेल्या या उपक्रमात गणेश कांबळे, सुनिल क्षीरसागर, अंकुश पवार आणि विकी देवकुळे हे कलाकार सहभागी झाले आहेत.
====
मत हे दान करण्यासाठी असून विक्री करण्यासाठी नाही. आजही लोककला थेट मनाला भिडते. त्यामुळे याच कलेच्या माध्यमातून मतदानाविषयी जागरुकता आणण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी अधिकाधिक मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा याकरिता या भारुड व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अपलोड करुन त्याच्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जाणार आहे.
- आसराम कसबे, लोककलावंत