व्रांदे सरपंच निवडणूक गणसंख्येअभावी तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:45+5:302021-02-26T04:16:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाईट : वांद्रे (ता. खेड) येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर सरपंचपदाची निवडणूक सभा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाईट : वांद्रे (ता. खेड) येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर सरपंचपदाची निवडणूक सभा गणसंख्येअभावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तहकूब करून एकादिवसासाठी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. एक सदस्य सहलीवर गेला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. आम्ही निवडून दिलेला सदस्य आम्हाला विश्वासात न घेता बाहेर जातोच कसा, अशी भूमिका घेत संतप्त ग्रामस्थांनी सर्व रस्ते अडवून ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता.
सुरुवातीपासून वांद्रे येथील ग्रामपंचायत निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. बिनविरोध निवडून दिलेले काही उमेदवार सहलीवर असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीकडे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी मंगल तांबेकर आणि रूपाली मेठल यांनी अर्ज दाखल केले. तर उपसरपंचपदासाठी संजय जाधव, दत्ता चौधरी व नितीन मेठल यiनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये नितीन मेठल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत कोणीही अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी नवीन गुंडाळ यांनी घेतला. परंतु, या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे नाही असे संजय जाधव, मंगल तांबेकर, शशिकला जाधव यांनी लेखी देऊन सर्व बाहेर पडले. यामुळे ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत अवघे ३ ग्रामपंचायत सदस्य उरले. निवडणूक घेण्यासाठी गणपूर्ती संख्या ही ४ सदस्य आहे. ती पूर्ण होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गुंडाळ यांनी निवडणुकीची सभा गणसंख्येअभावी एक दिवसासाठी तहकूब केली. या वेळी सभागृहामध्ये दत्ता चौधरी, रूपाली मेठल, कांता सावंत या उपस्थित होत्या.
याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत आवारात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीवेळी ग्रामपंचायत आवारात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये माहिलांची मोठी गर्दी होती. त्यांनी आम्ही बिनविरोध निवडून दिलेला सदस्य आम्हाला न विचारता सहलीवर गेल्याने सरपंच पदाबाबत ग्रामस्थ सांगतील, तसेच वागू असा शब्द दिला असल्याने त्यास आम्ही सहभागी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच त्याला अडविण्यासाठी सर्व रस्ते अडवले होते.
यामुळे काही वेळा पोलीस व ग्रामस्थांमध्ये वादावादी झाल्याने मोठा तणाव निर्माण झाल्या. शेवटी तो एक सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ न शकल्याने या ठिकाणी होणारा अनर्थ टळला. तो सदस्य कोणत्या कारणाने निवडणुकीसाठी येऊ शकला नाही हे शेवटपर्यंत मात्र कळले नाही. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार भगवंत गिरजे, पूनाजी जाधव , संजय रेपाळे, डुंबरे आदी पोलिसांनी व पोलीस पाटील भीमाजी सावंत शांताराम मेठल, रोहिणी खंडागळे यांनी बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवीन गुंडाळ यांनी काम पाहिले तर सहायक म्हणून ग्रामसेवक कदम यांनी मदत केली.
- वांद्रे येथे सरपंच पदाच्या निवडणुकी वेळी काही काळ तणाव निर्माण झाला यावेळी ठेवण्यात आलेला बंदोबस्त.