अमेरिकेतील "शर्कराकंदा" वर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करणार प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 07:24 PM2020-02-05T19:24:42+5:302020-02-05T19:30:02+5:30
शर्कराकंद पीक पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न व्हीएसआयच्या माध्यमातून केला जाणार आ
पुणे : उसाला पर्याय म्हणून शर्कराकंदचा वापर करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने गेली काही वर्षे प्रयत्न सुरु आहेत. आता अमेरिकेतील १० जातींवर देखील व्हीएसआय संशोधन करणार असून, राज्यातील वातावरणात हे पीक कसे येईल, यावर चाचणी करणार आहेत. त्याबाबत दोन्ही देशातील संस्थांमधे नुकताच करार झाला आहे.
मांजरीतील व्हीएसआय संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित केली होती. त्यात अमेरिकेतील डॉ. इमाद एज्युएल यांनी अमेरिकेतील संशोधन केंद्रातील शर्कराकंद पिकाच्या १० जाती व्हीएसआयला देण्याचा करार केला. महाराष्ट्रातील हवामानामधे या जाती कशा तग धरतील यावर व्हीएसआयमधील संशोधक काम करतील. व्हीएसआयने राज्यामधे शर्कराकंदचे प्रयोग या पुर्वीच सुरु केले आहेत.
पंजाबमधील राणा शुगरच्या कार्यक्षेत्रामधे व्हीएसआयच्या सहाय्याने १६ हजार एकरवर शर्र्क राकंदची लागवड करण्यात आली आहे. या पिकापासून हेक्टरी ७५ ते ८० टन उत्पादन मिळत असून, १३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. हिवाळी हंगामातही या पिकाची चाचणी घेण्यात येईल. उसाला तुलनेने अधिक पाणी लागते. पाण्यावर येणारा ताण लक्षात घेता, शर्कराकंदाकडे उसाला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. पाण्याअभावी अनेक कारखान्यांना पुुरेसा ऊस उपलब्ध होत नाही. त्यामुळे नजीकच्या काळात कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शर्कराकंद पीक पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न व्हीएसआयच्या माध्यमातून केला जाणार आहे.
------------
हुमणीवर लागू होणार बुरशीची मात्रा
उसावरील खोडकिड, लोकरी मावा, अमेरिकन लष्करी अळी आणि हुमणी किडींचा प्रादुर्भाव व त्यासाठीचे जैविक नियंत्रणावरही या परिषदेत चर्चा झाली. हुमणीच्या नियंत्रणासाठी वेब्हीरिया कोंगानेट्री तसेच मेटारायझीयम अॅनोसपली ही परोपजीवी मित्र बुरशी शेधल्याची माहिती बेंगळुरु येथील नॅशनल ब्युरो आॅफ अॅग्रीकल्चरल इन्सेक्ट रिसोर्सेसचे (एनबीएआयआर) संचालक डॉ. चंदीश आर. बल्लाळ यांनी दिली. या परोपजीवी मित्र बुरशीची शिफारस केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.