वा क्या बात है! पुण्यात गुंडांना बेक्कार चोपणाऱ्या पोलिसांना २५ हजारांचे बक्षीस अन् सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:53 PM2023-01-09T13:53:21+5:302023-01-09T14:03:18+5:30
सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली होती
पुणे : वडगाव बुद्रुक आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत माजवणाऱ्याला अक्षय इंगवले व धनंजय पाटील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या आरोपीची धु धु धुलाई केली होती. दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या या तरुणाने हातात कोयता घेऊन दहशत माजवित हे कृत्य त्याने केले होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला ताब्यात घेतले.
दहशत माजविणाऱ्या गुंडांना चोप देणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले आहे. सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविण्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी इंगवले आणि पाटील यांनी त्यांचा पाठलाग करून एकाला पकडले. खाऊ गल्लीत त्यांना चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.
या कारवाईची दखल पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत इंगवले आणि पाटील यांचा सत्कार केला. या प्रसंगी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डाॅ. जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.