वढू बुद्रुकला लोटला शंभूभक्तांचा महासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:09 PM2019-04-05T23:09:31+5:302019-04-05T23:10:21+5:30
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी ११.३० वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली.
कोरेगाव भीमा : धर्मवीर श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि ५) राज्यभरातून आलेल्या लाखो शंभूभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टी करत संभाजीमहाराजांना अभिवादन केले. या वेळी शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले .
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी ११.३० वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी व्यंकोजीराजे भोसले (तंजावर) यांचे १४ वे वंशज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, चारुदत्त आफळे, वढू बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच लाखोंच्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधिस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंदना दिल्याने बलिदानस्मरण दिनास वेगळे महत्त्व प्राप्त झाले. यावेळी पै. संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजीमहाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक- तुळापूर, धर्मवीर संभाजीमहाराज प्रतिष्ठान गोदाकाठ येथून पालखी, श्री शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढू बुद्रुक पालखी, पुण्यातून हेगडेवार ज्योत, आईसाहेब आध्यात्मिक ज्ञानविज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढू पालखी व राज्यभरातून असंख्य शंभूभक्त ज्योत घेऊन समाधिस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. समाधिस्थळावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, सिनेअभिनेते अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, बापू पठारे उपस्थित होते.
यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज पुरस्कार राष्ट्रीय कीर्तनकार आफळे यांना, तर शंभूभक्त अशोक भंडलकर शंभूसेवा पुरस्कार नवी मुंबई येथील धर्मवीर शंभूराजे उत्सव मंडळ, शंभूभक्त डी.डी भंडारे शंभूसेवा पुरस्कार पुणे येथील श्रीरंग कला दर्पण यांना तर शंभूभक्त गेणू गणपत शिवले शंभूसेवा पुरस्कार तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर तुकाराम शिवले यांना प्रदान करण्यात आला. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मृत्युंजय पुरस्कार जाहीर केला.
या धर्मसभेनंतर पोवाडा सादर करण्यात आला. समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक व धर्मवीर संभाजीराजे युवा
मंच, जय गणेश ग्रुप यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे
आयोजन करण्यात आले होते. सुनील आहेर, पंडित शिवले यांनी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
या वेळी स्वागत रेखा शिवले यांनी व प्रास्ताविक मिलिंद एकबोटे तर आभार रमाकांत शिवले यांनी मानले. सूत्रसंचलन श्रीकांत ढमढेरे यांनी केले.
शंभूतीर्थ वढू बुद्रुकला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
शंभूछत्रपतींचे समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक याठिकाणी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असून, तो ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, शासनाकडे ब वर्गाचा दर्जा देण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले व सरपंच रेखा शिवले यांनी केली.
छत्रपती संभाजीमहाराजांना शासकीय मानवंदना : पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रम
महाराजांचे गुण अंगीकारा : चारुदत्त आफळे
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३३० व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त धर्मसभेत चारुदत्त आफळे म्हणाले, शंभूछत्रपतींनी रामशेज किल्ला जिंकताना लाकडाची तोफ
निर्माण केली.
2ही कामगिरी जगात अद्वितीय आहे. अशा पराक्रमी राजाकडून आपल्याला इंजिनिअरिंग, अर्थशास्त्र, उत्तम प्रशासकीय नेतृत्वाचे धडे तसेच महाराणी येसूबार्इंना राज्यकारभाराचा अधिकार देत स्त्रीवगार्चा सन्मान केला, असे
त्यांचे गुण अंगीकारण्याची वेळ आली आहे.
3पुढील काळात चातुर्मास, वैष्णवमास याप्रमाणे बलिदानमास देशभरात पाळला जाऊन शंभूछत्रपतींच्या इतिहासाचे पारायण केले तरच राजांना आदरांजली वाहिली जाईल, असे सांगितले. पांडुरंग बलकवडे यांनी शंभूछत्रपतींचा इतिहास शंभूभक्तांसमोर मांडला.