रोहयो कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:26+5:302021-02-24T04:10:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रोजगार हमीच्या सामूहिक कामांवर येणाऱ्या मजुरांची मजुरी गेली दोन महिन्यांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रोजगार हमीच्या सामूहिक कामांवर येणाऱ्या मजुरांची मजुरी गेली दोन महिन्यांपासून मिळाली नाही. ही थकीत मजुरी तातडीने अदा करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रोजगार हमीची सामूहिक कामे मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. नुकतेच राज्यात रोजगार हमीच्या कामात पहिल्यांदाच पुणे जिल्हा पाचव्या क्रमांकावर आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमनुसार रोजगारीत वेतनाचे दर आठवड्याला, किंवा असे काम केल्याच्या दिनांकानंतर पंधरवड्याच्या आत वितरण करण्यात येतात. हजेरीपत्रक बंद झाल्यावर वेतन प्रदान करण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास दंड आकारण्यात येईल, असेही नमूद केलेले आहे.
आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील मजुरांना काम करूनही दोन महिने मजुरी मिळत नाही. हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन आहे. तरी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यात तातडीने लक्ष घालून, मजुरांना मजुरी मिळवून देण्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी मागणी किसान सभा पुणे जिल्हा समितीने निवेदनाद्वारे केलेली आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीतून जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील स्थलांतर काही प्रमाणात का होईना थांबण्यास मदत होत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. या अनुषंगाने मजुरी न मिळाल्याने लोकांमध्ये रोजगार हमी कायद्याविषयी नकारात्मकता पसरली जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी वेळेवर मजुरी मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क कोणत्याही परिस्थितीत डावलला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
या निवेदनावर किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे, याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पेकारी, विश्वनाथ निगळे,राजू घोडे, डॉ. मंगेश मांडवे,लक्ष्मण जोशी यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.
चौकट
जुन्नर तालुक्यातील इंगळूण, आंबे, उसराण, हडसर, खैरे-खटकाळे, हातवीज, कुकडेश्वर या गावातील मजुरांना त्यांनी केलेल्या रोजगार हमी वरील कामाची थकीत मजूरी त्वरित मिळावी. आंबेगाव तालुक्यातील बोरघर, सावरली, पिंपरी, आपटी, आहुपे या गावातील मजुरांना त्यांनी केलेल्या रोजगार हमी वरील कामाची थकीत मजुरी त्वरित मिळावी. जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणची रोजगार हमीची थकीत मजुरी असेल ती त्वरित अदा करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
आहेत.
23022021-ॅँङ्म-ि02 - आहुपे येथे सुरू असलेले रोजगार हमी योजनेचे काम.