वाघापूर चौफुला तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 12:32 AM2016-05-14T00:32:16+5:302016-05-14T00:32:16+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वपूर्ण ओळख असणारा तसेच पुरंदर-हवेली तालुक्यातील गावांना जोडणारा वाघापूर चौफुला हा राजरोसपणे होणाऱ्या मद्यविक्रीमुळे सध्या
वाघापूर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वपूर्ण ओळख असणारा तसेच पुरंदर-हवेली तालुक्यातील गावांना जोडणारा वाघापूर चौफुला हा राजरोसपणे होणाऱ्या मद्यविक्रीमुळे सध्या तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अलीकडच्या काळात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे वाघापूर चौफुल्यावर उद्योग व्यवसायवाढीसाठी कृषीसेवा केंद्र, दवाखाना, हॉटेल, चहाची दुकाने, केशकर्तनालय, मोटर गॅरेज, मंगल कार्यालय, शेतीउपयोगी अवजारे दुकान आदीसोबतच ढाबा, हॉटेलांची सोय झाल्याने तळीरामांना आयतीच संधी निर्माण झाली आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून हॉटेल व ढाब्यांची उभारणी केली असली तरी राजरोसपणे होणाऱ्या दारूविक्रीमुळे या परिसरातील युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दारूविक्रीसाठी परवाने असल्याचे बोलले जाते. मात्र दारूविक्रीमुळे परिसरातील किती कुटुंबे उद्ध्वस्त होतात, याचा कधीच विचार केला जात नाही.
शासनानेदेखील परवाने वितरीत करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नियम व अटींच्या आधीन राहूनच वितरित करावेत. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे मत या परिसरातील जाणकारांनी व्यक्त केले.
काही ठिकाणी तर परवाने नसतानादेखील ढाब्यांमधून राजरोसपणे दारू विकली जाते. यावरून हॉटेल व्यावसायिक व प्रशासनाचे अर्थपूर्ण लागेबांधे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिसरातील तरुणांचे आयुष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे.
दारूमुळे अनेक पिढ्या बरबाद झालेल्या असल्यामुळे शासनानेदेखील दारूविक्रीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा आजची तरुण पिढी उद्याचे देशाचे उज्ज्वल भविष्य बनविण्यासाठी गांभीर्याने राजरोसपणे होणाऱ्या मद्यविक्रीवर निर्बंध घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)