वाघजाईदेवी यात्रा उत्सवनिमित्त पुण्यातील पळसोशीत रंगला मातीतील कुस्त्यांचा आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:33 PM2018-01-06T13:33:47+5:302018-01-06T13:39:27+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री वाघजाईदेवी यात्रा-उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील पळसोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री वाघजाईदेवी यात्रा-उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
विसगाव खोऱ्यातील ग्रामदैवतांच्या पहिल्या टप्प्यातील यात्रा-उत्सव पळसोशी गावच्या वाघजाईदेवीच्या उत्सवाने चालू होतो. बुधवारी (दि. ४) पहाटे देवीला अभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, पारंपरिक ढोलताशाचा खेळ दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा आणि मातीतील जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला.
या वेळी प्रकाश म्हस्के, बाळू राऊत, अंकुश म्हस्के, पोपट जाधव, तारक म्हस्के, अमित म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, गोपीचंद म्हस्के, सरपंच रामचंद्र म्हस्के, तुकाराम म्हस्के यांनी पंच म्हणून, तर खजिनदार आनंदा म्हस्के, अंकुश म्हस्के, संतोष म्हस्के यांनी काम पाहिले.
या आखाड्यात तालुक्यातील शेकडो नामवंत पैलवानांनी हजेरी लावली. ५० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत ग्रामस्थांकडून कुस्त्यांना इनाम देण्यात आले. पैलवानांनी चितपट कुस्त्या करून पंचक्रोशोतील तसेच तालुक्यातील कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.