नागरी सुविधांची वाघोलीत वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:01+5:302021-02-25T04:13:01+5:30
पुणे : वाघोली ग्रामपंचायतीकडे पैसा भरपूर असून नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. महाराष्ट्रात टाळेबंदीनंतर सर्व कामे ...
पुणे : वाघोली ग्रामपंचायतीकडे पैसा भरपूर असून नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. महाराष्ट्रात टाळेबंदीनंतर सर्व कामे नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे घरूनच केली. त्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांसाठी त्रासदायक होते. आयटी क्षेत्र असूनही गावात मुबलक वीज पुरवठा नाहीये. अठरा हजार लोकसंख्येत एक सब डिवीजन असल्याने महावितरणचाही बेजबाबदार कारभार नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडला.
पुणे हे जरी महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर असले तरीही पुण्याचे विद्येचे माहेरघर हे वाघोली आहे. अनेक मोठ्या आणि नामांकित शैक्षणिक संस्था वाघोलीत आहेत. मात्र महाविद्यालयांच्या परिसरातील रस्ते, महिला सुरक्षेचा मुद्दा अजून अनिर्णित आहे. शाळा आणि शैक्षणिक संकुलांच्या परिसरातली वाहतूक कोंडी ही डोकेदुखी ठरली आहे.
कुठलेही प्रकल्प सुरू करायचे तर त्यासाठी जागा शोधली जाते. वाघोलीच्या बाबतीत तसे नाही. वाघोलीत जवळपास तीनशे एकर क्षेत्र गायरान असल्याने चांगल्या प्रकल्पांसााठी गावात जागा आहे. मात्र या गायरानांवर अतिक्रमणे झाली असून आता गायरानच शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती स्थानिक देतात. विलीनीकरणामुळे आमच्यावर अधिक कराचा भार बसू नये अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.
चौकट
“या आधी महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांना विकासकामांसाठी फक्त ८४ लाखांचा निधी उपलब्ध झाला तर वाघोलीचं काय होणार?”-महेंद्र भाडळे, उपसरपंच
चौकट
“वाघोली गावातील रस्त्यांची कामे प्रत्येकी एक कोटी रुपये खर्चुन सुरू झाली. आधी ग्रामपंचायतीने गावातील विकासकामांचे नियोजन करावे, मग विलीनीकरणाच व्हावे.” -अर्चना कटके, ग्रामपंचायत, सदस्य
चौकट
“वाघोलीचे महापालिकेत विलीनीकरण करताना विशेष निधी मंजूर करून द्यावा त्याचबरोबर विकास आराखडा तयार करताना त्यासंदर्भातील निधी गावाला हस्तांतरित करण्यात यावा.” -संदीप सातव, ग्रामपंचायत, सदस्य
चौकट
“वाघोलीतील गायरानाखाली जी जमीन आहे. त्यावरील अतिक्रमण काढून तेथील अतिक्रमितांना गावातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून घरे बांधून दिली पाहिजे.”
-किसन महाराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते.