वाघोली-आव्हाळवाडी- मांजरी रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:22 AM2019-01-07T00:22:42+5:302019-01-07T00:22:52+5:30
ड्रेनेज पाइपलाइनचे कामही सुरू : अरुंद रस्त्यावरील खड्ड्याने प्रवासी हैराण
आव्हाळवाडी : वाघोली- आव्हाळवाडी-मांजरी खुर्द रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत, की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले; मात्र तरीदेखील लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता ग्रामस्थांनाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असे माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव व माजी सरपंच प्रवीण आव्हाळे यांनी सांगितले.
आव्हाळवाडी ते वाघोली रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि वाहनचालक वैतागले आहेत. याच रस्त्यावर दारूचे दुकान आणि हॉटेल, लहान मोठी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे दारू
पिऊन गाडी चालविणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. त्यामुळे कायम अपघात घडतात. याबाबत, वाघोली ग्रामपंचायत आणि संबंधित खाते सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आव्हाळवाडी ग्रामपंचायतीने केला आहे. २० जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरु केल्यास २१ जानेवारीपासून रस्ता बंद करून गांधीगिरी मार्गाने आंदोनल करून, या मार्गावरील खड्ड्यांवर वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रेनेजचे काम संथगतीने
४याच रस्त्यावर वाघोली ग्रामपंचायतीचे ड्रेनेज पाईपलाईनचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे नागिरकांची आणखी
पंचाईत होत आहे.
४आधीच खराब रस्ता. त्यात पाईपलाईनमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खड्डे खोदून त्याची माती रस्त्यावर टाकल्याने रस्ता अधिक अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहतूक कमी असतानासुद्धा अरुंद रस्त्यामुळे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत
आहे.