MPSC: अखेर प्रतीक्षा संपली! २९० पदे भरणार, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:05 AM2021-10-05T11:05:05+5:302021-10-05T11:05:45+5:30
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्य कर आयुक्त पद भरणार
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अखेर विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण २९० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्य कर आयुक्त या पदांसाठी २ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ६ जुलै रोजी १५ हजार ५११ पदांची घोषणा केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) अंतर्गत महिनाभरात ही पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. मात्र, दोन महिन्यांनंतरही याबाबत कोणतीही हालचाली झाल्या नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जाहिरात प्रसिद्ध केल्याने अखेर या विषयावर पडदा पडला आहे.
कोरोनामुळे दीड-दोन वर्षांपासून एमपीएससीने नवीन कोणत्याच परीक्षेची घोषणा केली नव्हती. त्यामुळे एमपीएससीची तयारी कशी करायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. तसेच निश्चित वेळापत्रक नसल्याने अभ्यासावर परिणाम होत असल्याचे महेश घरबुडे, नीलेश गायकवाड, आदिती भोसले, शिवाजी इंगवले या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’जवळ व्यक्त केेले होते. आयोगाने काढलेल्या जाहिरातीमुळे त्यांनी आज समाधान, आनंद व्यक्त केला.
२९० पदांची...अशी असेल विभागणी
उपजिल्हाधिकारी १२ पदे, पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त १६ पदे, सहायक राज्य कर आयुक्त १६ पदे, गट विकास अधिकारी १५ पदे, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा १५ पदे, उद्योग उपसंचालक (तांत्रिक) ४ पदे, सहायक कामगार आयुक्त २२ पदे, उपशिक्षणाधिकारी २५ पदे, कक्ष अधिकारी ३९ पदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४ पदे, सहायक गटविकास अधिकारी १७ पदे, सहायक निबंधक सहकारी संस्था १८ पदे, उप अधीक्षक भूमी अभिलेख १५ पदे, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क १ पद, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क १ पद, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी १६ पदे आणि सरकारी कामगार अधिकारी ५४ पदे अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध संवर्गातील २९० पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.