पुण्यात भारत-इंग्लंड झुंजणार ; पण प्रेक्षकांना असणार 'नो एन्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 07:22 PM2021-02-27T19:22:33+5:302021-02-27T19:33:34+5:30
भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार की नाही याबाबतची अनिश्चितता संपली आहे.
पुणे : भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार की नाही याबाबतची अनिश्चितता संपली आहे. पुण्यातील महाराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर भारत- इंग्लंड दरम्यान खेळले जाणारे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार नाही. प्रेक्षकांविनाच हे सामने खेळविले जाणार आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्नींग कौन्सिलचे अध्यक्ष मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत- इंग्लंड दरम्यानचे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. नियोजनाप्रमाणे पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटचे सामने होण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही अनिश्चितता संपली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामने घेण्यासाठी आवश्यक तयारी करण्यास सुरूवात केल्याचे काकतकर यांनी सांगितले. पुण्यातील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.