ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्यासाठी आठवडाभर थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:50+5:302021-06-20T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रुग्णसंख्या कमी झाल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरांत त्वरित निर्बंध शिथिल केले. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रुग्णसंख्या कमी झाल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरांत त्वरित निर्बंध शिथिल केले. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरापर्यंत निर्बंध शिथिल करणे आवश्यक होते. पण, आठ दिवस झाले तरी ग्रामीण भागातील निर्बंध कायम आहेत. आता किमान या आठवड्यात तरी ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करा, अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि सुनील शेळके यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, मी दोन दिवसांची रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय घेईन व तसे आदेश जिल्हाधिकारी यांना देईन. पण ग्रामीण भागात सध्या तरी कोणतेही बदल होणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने बैठकीत चालू आठवड्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या, पाॅझिटिव्ह दर आणि त्यानुसार निर्बंधस्तर काय असेल असे स्पष्ट केले. यामध्ये पुणे शहराचा पाॅझिटिव्ह दर पाच टक्क्यापेक्षा कमी म्हणजे ४.८ टक्के निर्बंधस्तर एक, पिंपरी-चिंचवड शहराचा पाॅझिटिव्ह दर ५.१ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन व ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्ह दर ८.५ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन झाला आहे. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून दहा टक्क्यापेक्षा पाॅझिटिव्ह दर कमी झाला असताना आजही चौथ्या स्तराचेच निर्बंध लागू आहेत. मोहिते यांनी सांगितले ग्रामीण भागात दुपारी २ पर्यंत दुकाने सुरू असल्याने प्रचंड गर्दी होते. तर राजगुरुनगर शहरामध्ये तर सकाळी ११ पर्यंत दुकाने सुरू आहेत. आता या आठवड्यात तरी निर्बंध शिथिल करा. पण ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होण्यासाठी आणखी एक आठवडा थांबा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.