वाकड ठाण्याला इमारतीची प्रतीक्षा
By admin | Published: March 14, 2016 01:10 AM2016-03-14T01:10:31+5:302016-03-14T01:10:31+5:30
हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या विभाजनातून तयार झालेल्या वाकड पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामाला उशिरा सुरुवात झाली.
वाकड : हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या विभाजनातून तयार झालेल्या वाकड पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामाला उशिरा सुरुवात झाली. सुमारे सात महिन्यांनी जूनअखेरीस ही नवीन इमारत पोलीस खात्याला हस्तांतरित करण्यात येणार असल्याने वाकड पोलिसांना सध्या तरी दुरून डोंगर साजरे करावे लागणार आहेत.
वाकड सेक्टर क्रमांक ४०मधील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोक्याच्या २५ गुंठे जागेत हे प्रशस्त ठाणे प्राधिकरण उभारत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आॅगस्ट २०१४मध्ये या कामाचे भूमिपूजन झाले. बांधकामाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीत या इमारतीचा ताबा देणं अपेक्षित होते.
मात्र, येथील जमिनीखाली वाकडला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुरवठा विभागाने हलविण्यास विलंब केला.
वाकड ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर रहाटणी, काळेवाडी यांसारखा किचकट आणि दाट लोकवस्तीचा भागही जोडला गेला. असे असताना वाकड पोलीस ठाणे लांब पल्ल्याच्या आणि एका कोपऱ्यात वाकड पुलाखाली तात्पुरत्या वास्तूत सुरू असल्याने नागरिकांबरोबर पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच हे ठाणे तुटपुंज्या जागेत
आणि अपुऱ्या सोयी-सुविधेत सुरू आहे. येथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठीदेखील जागा नाही. नवीन इमारत नागरिकांच्या दृष्टिकोनातून परिसराच्या मध्यभागी असल्याने सर्वांना सोयीस्कर
पडणार आहे. (वार्ताहर)काम अंतिम टप्प्यात
येथील जमिनीखाली जलवाहिनी असल्याने ती हटविण्याच्या किचकट कामाला विलंब झाल्याने काम पुढे ढकलले गेले. मात्र, सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. जूनअखेरीस पोलीस खात्याला इमारतीचा ताबा देणार आहोत.
- वसंत नाईक, उपअभियंते, नवनगर विकास प्राधिकरणत्वरित इमारत द्यावी
सध्या अत्यंत किचकट लहानशा जागेत आमचा कारभार सुरू आहे. त्या तुलनेत आमचा आवाका खूप मोठा आहे. हे प्रशस्त आणि सुसज्ज पोलीस ठाणे त्वरित मिळाल्यास नागरिकांच्या व प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल, तसेच हद्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.
- एन. जे. शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड