ससूनला मिळेना भरतीचा ‘डोस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:15 PM2018-04-17T13:15:51+5:302018-04-17T14:14:46+5:30
ससून रुग्णालयामध्ये एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर पदांमध्ये वाढ झालेली नाही. तसेच मंजूर पदांपैकीही अनेक पदे रिक्त आहे.
राजानंद मोरे
पुणे : ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी मागील काही वर्षांत विविध पदांची भरती न झाल्याने तब्बल ७७५ पदे रिक्त आहेत. डॉक्टर, परिचारिका यांच्यासह विविध तांत्रिक पदेही रिक्त असल्याने रुग्णालयावरील ताण वाढू लागला आहे. त्यातच मागील काही वर्षांत नवीन पदेही मंजूर न झाल्याने पुर्वीच्या रचनेनुसार काम सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या रुग्णसंख्येचा विचार करून तातडीने पदनिर्मिती व भरती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रुग्णालयामध्ये पूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, मागील काही वर्षांत रग्णालयाने कात टाकली आहे. विविध विभागांचे नुतनीकरण, चांगल्या सोयीसुविधा, नवीन शस्त्रक्रिया विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांसह विविध कारणांमुळे रुग्णालयाचा कायापालट होत आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय रुग्णांचा ओढाही वाढू लागला आहे. मागील वर्षी बाह्यरुग्ण विभागाने सात लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्याही पाऊण लाखाच्या पुढे गेली आहे. दैनंदिन शस्त्रक्रिया, विविध तपासण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज दीडशेहून अधिक लहान-मोठ्या शस्त्रक्रिया होत आहेत. जानेवारी महिन्यात तब्बल १ लाख ७२ हजार विविध प्रकारच्या तपासण्या झाल्या होत्या.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना त्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर पदांमध्ये वाढ झालेली नाही. तसेच मंजूर पदांपैकीही अनेक पदे रिक्त आहे. रुग्णालयात वर्ग एकची आठ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ दोन पदांवर पूर्णवेळ अधिकारी आहेत. त्यामध्ये प्रपाठक नेफ्रोलॉजी आणि सहायक प्राध्यापक समावेश आहे. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिक्षक ही महत्वाची पदे रिक्त असून इतर दोघांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
-----------
मागील दोन वर्षांची रुग्णांची तुलनात्मक स्थिती
वर्ष २०१५ २०१७
बाह्यरुग्ण विभाग ६ लाख ४१ हजार ७ लाख ८ हजार
आंतररुग्ण विभाग ६२ हजार ९३२ ७८ हजार
शस्त्रक्रिया १९ हजार ६५१ ५७ हजार
----------------------
रुग्णालयाची सद्यस्थिती (जाने. २०१८) -
एकुण बेड - १४९६
एकुण दाखल रुग्ण - ७४१७
दैनंदिन बाह्यरुग्ण - २५१९
दैनंदिन शस्त्रक्रिया - १६६
एकुण प्रयोगशाळा तपासण्या - १,७१,८९७
-----------------ससून रुग्णालयातील रिक्त पदे
वर्ग मंजूर भरलेली रिक्त
वर्ग १ ०८ ०२ ०६
वर्ग २ १३५ ७२ ६३
वर्ग ३ १५८२ १२३९ ३४३
वर्ग ४ ८३४ ४७९ ३५५
आयुर्वेद १८ १० ०८
--------------------------------------
एकुण २५७७ १८०२ ७७५