प्रतिक्षा संपली, ई-बस शनिवारपासून मार्गावर : मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 08:15 PM2019-02-07T20:15:06+5:302019-02-07T20:21:32+5:30
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत.
पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बस शनिवार (दि. ९) पासून पुणेकरांच्या सेवेत रूजू होत आहेत. इतर बसच्या तिकीट दराप्रमाणेच या बसचे तिकीट दर असल्याने प्रवाशांना कमी पैशांमध्ये आरामदायी प्रवास करता येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणार आहेत. सुरूवातीला प्रजासत्त्ताक दिनी पुणेकरांच्या सेवेत या बस आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नियोजित वेळेत बस न आल्याने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यांपुर्वी ताफ्यात १० बस रुजू झाल्या. या बसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने मागील काही दिवस बस आगारांमध्येच उभ्या होत्या. अखेर शनिवारी पहिल्या टप्प्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बसचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
ई-बसचे तिकीट दर इतर नियमित बस एवढेच असतील. तसेच सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार आहेत. वातानुकुलित व आरामदायी बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. एकुण सात मार्ग निश्चित करण्यात आले असून त्यातील चार मार्ग पुण्यातील तर तीन मार्ग पिंपरी चिंचवडमध्ये आहेत.
-------------
पुढील आठवड्यात नियमित संचलन
सध्या पीएमपीला १० बस मिळाल्या असून शनिवारपर्यंत उर्वरित बस मिळण्याची शक्यता आहे. तसेच केवळ दहा बसचीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सर्व बस मार्गावर येण्याची शक्यता कमी आहे. याबाबत अद्याप नियोजन झालेले नाही, असे पीएमपीतील अधिकाºयांनी सांगितले. उर्वरित १५ बसची नोंदणी पुढील आठवड्यात होऊ शकते. त्यानंतरच या बस मार्गावर येतील. तोपर्यंत उपलब्ध बस ठरावित मार्गांवर सोडण्यात येतील.
या मार्गावर धावणार ई-बस
१. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३
बस - ६
फेºया - ९६
वारंवारिता - २० मिनिटे
२. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा
बस - २
फेºया - २०
वारंवारिता - ४५ मिनिटे
३. निगडी ते भोसरी
बस - २
फेºया - ४८
वारंवारिता - ६० मिनिटे
४. हडपसर ते पिंपळे गुरव
बस - ३
फेºया - ६०
वारंवारिता - ३० मिनिटे
५. भेकराईनगर ते न. ता. वाडी
बस - ३
फेºया - ४८
वारंवारिता - ४५ मिनिटे
६. भेकराईनगर ते पुणे स्टेशन
बस - ३
फेºया - ५४
वारंवारिता - ३० मिनिटे
७. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३
बस - ३
फेºया - १८
वारंवारिता - ६० मिनिटे
..............................
------------
अशी असेल ई-बस
- वातानुकुलित
- आरामदायी बैठक व्यवस्था
- आसनक्षमता - ३१
- मोबाईल चार्जिंगची सुविधा
- पॅनिक बटन
- सीसीटीव्ही
- इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस)
- तीन तासात बॅटरी चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर अंतर धावणार
- एका युनिटमध्ये ३ किलोमीटर अंतर धावणार
- प्रदुषण कमी होणार
------------------------