पक्क्या वाहन परवान्याची प्रतीक्षा होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 07:37 PM2019-11-14T19:37:41+5:302019-11-14T19:41:08+5:30
‘आरटीओ’ : कारसाठी फुलेनगर येथील ट्रॅक सोमवारपासून खुला
पुणे : कार चालविण्याचा पक्का परवाना मिळण्याचा प्रतीक्षा कालावधी आता किमान १५ दिवसांनी कमी होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा फुलेनगर येथील चाचणी ट्रॅक येत्या सोमवार (दि. १८) पासून खुला करणार आहे. त्यासाठी रविवार सकाळपासून पूर्वनियोजित वेळ घेता येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. तसेच दुचाकीच्या कोट्यातही वाढ केल्याने वाहनचालकांना परवान्यासाठी अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिकाऊ व पक्का परवाना घेण्यासाठी सध्या ऑनलाईन पध्दतीने पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू केल्याने इच्छुक उमेदवारांच्या वेळेची बचत तसेच आर्थिक लूट थांबली आहे. मात्र, काही महिन्यांपर्यंत पूर्वनियोजित वेळ घेण्यासाठी लागणारा कालावधी ४ ते ५ महिने लागत होता. त्यामुळे या प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सुर होता. तसेच मोटार प्रशिक्षण संस्थांकडूनही विरोध होऊ लागला होता. पण टप्याटप्याने पूर्वनियोजित वेळेच्या दैनंदिन कोट्यामध्ये वाढ केली. त्यामुळे सध्या प्रतिक्षा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे व संजीव भोर उपस्थित होते.
कार चालविण्याच्या पक्क्या परवान्याची चाचणी सध्या भोसरी येथील इन्स्टिट्युट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च (आयडीटीआर) या संस्थेमधील ट्रॅकवर घेतली जाते. तेथील दैनंदिन कोटा ३२० एवढा आहे. पण ट्रॅकची दैनंदिन चाचणीची क्षमता कमी असल्याने कोटा वाढविणे शक्य नाही. त्यामुळे ‘आरटीओ’ने फुलेनगर येथील जुना ट्रॅक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी ‘आयडीटीआर’ येथे चाचणी सुरू केल्यानंतर हा ट्रॅक कारसाठी बंद केला होता. आता प्रतीक्षा कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून या ट्रॅकवर चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दैनंदिन कोटा १६० एवढा निश्चित केला आहे. रविवारी (दि. १७) सकाळी आठ वाजल्यापासून पुर्वनियोजित वेळ घेता येईल. या ट्रॅकमुळे प्रतिक्षा कालावधी किमान १५ दिवसांनी कमी होणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
.........
दुचाकीसाठीच्या पक्क्या परवान्याची चाचणी फुलेनगर व आयडीटीआर येथे घेतली जाते. दोन्ही ठिकाणच्या दैनंदिन कोटा आता ४०० पर्यंत वाढविला आहे. तसेच दुचाकी व चारचाकीसाठी एकत्र पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या उमेदवारांची चाचणी एकाच ठिकाणी होणार घेतली जाणार आहे. त्यासाठीची प्रतीक्षा यादीही कमी होणार आहे.
--
‘झिरो पेंडन्सी’साठी प्रयत्न
वाहन खरेदी केल्यानंतर वाहनमालकांना प्रत्यक्षात नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. तसेच वाहन परवान्यासाठीही तेवढेच दिवस थांबावे लागते. सध्या किमान तीन दिवसांत परवाना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील काळात हा कालावधी एका दिवसावर आणण्यात येईल. शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठीच्या पुर्वनियोजित वेळेचा प्रतीक्षा कालावधीही एका दिवसावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाईल.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग
--
शिकाऊ व पक्क्या परवान्याच्या पूर्वनियोजित कोट्याची स्थिती
दि. १ जूनपर्यंत सध्या
शिकाऊ ३०० ६००
पक्का परवाना
दुचाकी (गिअर) २०० ४००
कार १०८ ४८०
कार (टुरिस्ट) १६ ८०