‘लालपरी’साठी प्रतीक्षाच; राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्याऱ्या पुणे विभागाकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:14 IST2025-02-22T13:14:04+5:302025-02-22T13:14:42+5:30
- प्रवासी दीड लाखाच्या घरात

‘लालपरी’साठी प्रतीक्षाच; राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्याऱ्या पुणे विभागाकडे दुर्लक्ष
अंबादास गवंडी
पुणे :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) पुणे एसटी विभागातून सर्वाधिक महसूल मिळत आहे. दुसरीकडे पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. तरीही पुणे विभागात एसटी बसची संख्या आणि वयोमर्यादा ओलांडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय परिवहन राज्य मंत्र्यांकडून एसटी बस मिळण्यासाठी दोनवेळा बैठका घेण्यात आले. तरीही नव्या ‘लालपरी’साठी प्रतीक्षाच करण्याची वेळ पुणे विभागावर आली आहे.
एसटीच्या पुणे विभागात सध्या ७३० बस आहेत. या सर्व बस १२ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. कोरोनापूर्वी पुणे विभागात ११०० बस होत्या. मात्र प्रवासीसंख्या कमी होती. आता उलट परिस्थिती आहे. प्रवासीसंख्या दीडपटीने वाढली आहे. एसटी बस मात्र ४०० कमी झाल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना प्रशासनावर ताण पडत आहे. शिवाय राज्य सरकारच्या विविध सवलतींमुळे एसटीला प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली. त्यात उपलब्ध असलेल्या ७३० बस बारा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे जर्जर आणि खिळखिळ्या झालेल्या बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नव्या बस कधी मिळणार यासाठी वाट पाहण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली आहे.
मंत्र्यांकडून दोनवेळा बैठका
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) स्वमालकीच्या ३००० बस खरेदी केल्या आहेत. यातील बस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. पुणे विभागाला नव्या लालपरी लवकर आणि प्राधान्याने मिळाव्या यासाठी मंत्र्यांकडून दोन वेळा बैठका घेण्यात आले. तरीही उत्पन्न कमी आणि छोट्या विभागाला नव्या बस मिळत आहेत. पुण्याला मात्र नव्या बससाठी वाट पाहावी लागत आहे.
ठराविक मार्गावर नव्या गाड्या
पुणे विभागात एकूण १४ आगार असून, सध्या एसटीच्या ७३० बसगाड्या आहेत. त्यामध्ये खासगी तत्त्वावरील शिवनेरी, शिवाई या ७२ गाड्या असून, त्या केवळ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर चालविल्या जातात. इतर मार्गांवर लालपरी सोडल्या जात आहेत; परंतु, लालपरी बस या जुन्या झाल्याने अर्ध्या वाटेत बंद पडणे, ब्रेक नादुरुस्त होणे अशा घटना वारंवार घडत आहेत. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवासी वाढले दुपटीने
लालपरीच्या प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; पण या प्रवाशांचे नियमन करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी पुणे विभागातून ७० ते ८० हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करत होते. आता दीड लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करत आहेत. यातून सुमारे १ कोटी १० लाख इतका महसूल एसटीकडे जमा होत आहे.
पुणे विभागातील महामंडळाच्या बस
- एकूण उपलब्ध बस-७३०
- मार्गावरील बस-७३०
- खासगी इलेक्ट्रिक बस - ७२
- दैनंदिन प्रवासी संख्या-१ लाख ५० हजार
- दैनंदिन उत्पन्न - १ कोटी १० लाख