पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
By श्रीकिशन काळे | Published: June 16, 2024 05:08 PM2024-06-16T17:08:04+5:302024-06-16T17:08:28+5:30
पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळतोय
पुणे: सध्या मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मात्र पाऊस होत आहे. त्याचा जोर कमी झाला असून, काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुणे शहरात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला पहायला मिळत आहे. दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.
सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. सध्या खानदेश आणि पूर्व विदर्भात मॉन्सूनची वाट पाहिली जात आहे. आज रविवारी (दि. १६) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे.