प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था, नव्या इमारतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:29 AM2018-06-15T02:29:31+5:302018-06-15T02:29:31+5:30
खेड येथील प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीला भेगा पडल्या असून, जीर्ण झालेली इमारत धोकादायक बनली आहे.
दावडी - खेड येथील प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीला भेगा पडल्या असून, जीर्ण झालेली इमारत धोकादायक बनली आहे. खेड तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून, ‘प्रांत कार्यालयासाठी नवीन इमारत देता का कोणी?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फक्त प्रांत अधिकाऱ्यांचेच केबिन हायटेक असून, नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रांत कार्यालयासाठी नवीन स्वतंत्र इमारत मिळावी, अशी मागणी नागरिक कित्येक वर्षांपासून करीत आहेत.
खेड तालुक्यात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. नागरिकांच्या समस्या जटील होत आहेत. खेड
प्रांत कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. २१ वर्षांपूर्वी प्रांत कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर खेड तालुका तलाठी संघटनेची वाडा
रोड येथील इमारत घेण्यात
आली. त्यापूर्वी महात्मा गांधी विद्यालयासमोर प्रांत कार्यालय भाड्याने होते.
वाडा रोड येथील इमारतीचे भाड्यापोटी दर महिना १८८६ रुपये देण्यात येतात. या कार्यालयात आवक जावक, भूसंपादन, पडीक जमीन परवानगी, पुनर्वसन, फौजदारी, आस्थापना, आरटीएस अपील या कामासाठी नागरिक येतात.
- कार्यालयाची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. कार्यालयातील अनेक भिंतींवरील लाइटच्या वायरही उघड्या आहेत. इमारतीच्या मागील बाजूस कचरा दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.
- या कार्यालयातील कर्मचाºयांचे केबिन सुशोभित करून घेतले असले तरी नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. या कार्यालयात खेड तालुक्याच्या कानाकोपºयातून रोज १५०ते २०० नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यांना बसण्यासाठी जागा सोडाच पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही.
- कार्यालयातील कर्मचाºयांनासुद्धा स्वच्छतागृहांची सोय नसल्याने त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या महिलांची कुचंबणा होते. इमारतीच्या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते.
शासनदरबारी पाठपुरावा
- या इमारतीची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रांताधिकारी आले, बदलून गेले मात्र कोणी शासन दरबारी नवीन कार्यालयासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला नाही. इमारतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दारे खिडक्या तुटल्या आहेत. संडास, मुतारीची दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे.
- कार्यालयातील अनेक भागात अडगळीचे सामान, अस्वच्छता, विजेच्या उघड्या वायर, नागरिकांसाठी पाण्याची असुविधा अशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे. त्यामुळे फक्त अधिकाºयांचेच केबिन हायटेक होत असून, नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत आहे.