आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:32 AM2018-12-27T00:32:38+5:302018-12-27T00:33:16+5:30
महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे.
उरुळी कांचन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्नता असलेल्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे. याला प्रशासनाची ढिलाई म्हणायचे की संस्थाचालकांचे दुर्लक्ष? असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.
या कॉलेजने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेचा निकाल अद्याप लावलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते सुटले किंवा नाही, याचा काहीच तपास विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांना लागेना. पण, कॉलेज प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र या कॉलेजमध्ये दिसून येत आहे. येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने ५ आॅक्टोबर २०१८ ते २६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत प्रथम वर्ष बीएसस्सी, बीए व बीकॉम या वर्गांच्या आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा घेतल्या असून, त्या परीक्षा घेऊन सुमारे २ महिने म्हणजे ६० दिवस उलटूनही निकाल अद्याप जाहीर केलेला नाही.
ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील पालकांनी केली आहे.
वास्तविक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारी २०१७ रोजी काढलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ कलम ८९ अन्वये प्रत्येक कॉलेज परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून ३० दिवसांत घोषित करण्याचा प्रयत्न करतील; मात्र कोणत्याही परिस्थितीत हा निकाल उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांत घोषित करील, असे म्हटले असताना अजूनही निकाल जाहीर नाहीत, यावरून या नियमाची पायमल्ली केली जात आहे असेच दिसते.
ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते विषय सोडविण्यासाठी किंवा त्या विषयात पस होण्यासाठी विद्यापीठाने आॅक्टोबर बॅकलॉग ही एक संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली असते. या परीक्षेला बसून विद्यार्थी आपले मागील वर्षातील विषयात उत्तीर्ण होतात किंवा ते विषय सुटले, असे समजले जाते.
कॉलेजच्या निकालाच्या विलंबाबाबत प्राचार्य रामदास रसाळ यांच्याकडे चौकशी केली असता, अजून निकाल लागले नाहीत याला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, निकाल कधी जाहीर केला जाईल, याची नेमकी तारीख न सांगता लवकरात लवकर तो लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कॉलेजचे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र १५ जूनला सुरू होणे अपेक्षित असताना ते ९ जुलै रोजी चालू केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीत येणारी सर्व महाविद्यालये वेळेवर म्हणजे १५ जून २०१८ पासून सुरू करण्याचे व दोन सत्रांतील महाविद्यालयाचे काम ३० एप्रिल २०१९ ला संपवायचे, अशा आशयाचे परिपत्रक २३/०४/२०१८ रोजी काढलेले परिपत्रक क्र. ६७ द्वारे त्यांच्याशी सलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना दिले असतानाही उरुळी कांचन येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय ९ जुलै २०१८ पासून म्हणजे तब्बल २२ दिवस उशिरा सुरू करून एक प्रकारे विद्यापीठाच्या नियमांची पायमल्लीच केली होती आता निकाल वेळेवर न लावल्याने पुन्हा एकदा तीच री ओढली गेली आहे.