‘ओव्हरटाईम’च्या पैशाची प्रतीक्षा
By Admin | Published: December 4, 2014 04:58 AM2014-12-04T04:58:29+5:302014-12-04T04:58:29+5:30
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून ओव्हरटाइम केलेल्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. या कर्मचा-यांनी
खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून ओव्हरटाइम केलेल्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. या कर्मचा-यांनी मंगळवारी बोर्डाच्या कार्यालयात जमून जादा कामाचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी केली. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून जादा कामाचे पैसे देण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. परंतु, बोर्डाने अद्याप दखल घेण्याची तसदीही दाखविली नाही.
सफाई कर्मचाऱ्यांसह अग्निशामक व सुरक्षारक्षकांना आतापर्यंत जादा कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यासाठी बोर्डाच्या आरोग्य विभागातील तीसपेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी के. जे. एस. चौहान यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे सर्वजण अवाक् झाले.
मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत कार्यालय गाठल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे म्हणाले, ‘‘कर्मचाऱ्यांची मागणी योग्य आहे. ते पैसे वेळच्या वेळी देणे गरजेचे होते. प्रत्येक वेळी प्रशासन दिवाळी व शाळा सुरूहोण्यापूर्वी पैसे देते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत हे पैसे देणे शक्य झाले नाही.
सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचे पैसे दिले जाऊ शकत नाहीत. मात्र, प्रशासन अत्यावश्यक सेवेमध्ये या पैशांची तरतूद करवून घेते. कामगारांना जादा कामाचा मोबदला देण्यात येतो. त्यामुळे कामगारांना जानेवारी महिन्यात हे पैसे कसे देता येतील, यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.’’ (वार्ताहर)